घसरता रूपया.. घसरतं राजकारण

राम मंदिराच्या प्रवेशाची तारीख, नोटांवर गणपती-लक्ष्मी यांचे छायाचित्र अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत. या देशात ८० टक्के हिंदू राहतात. त्या हिंदूंचे रोजचे जगण्या-मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत. महागाई- बेरोजगारीतून हिंदूंना मुक्ती नाही, सवलत नाही. अशा वेळी या देशाला धर्मवेडे बनवून मूळ प्रश्न आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांसाठी हे नालायक राजकीय पक्ष देवी-देवतांचे फोटो-नाव यांचा आधार घेत आहेत. अरविंद केजरीवाल या षडयंत्रातील जुनेच कलाकार आहेत. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख;

Update: 2022-10-26 13:28 GMT

थँक गॉड! मेरी अंडरविअर का नाम डॉलर है, रूपया होता तो बार बार गिरता, पासून सुरु झालेला आपला प्रवास आता रुपया सावरण्यासाठी नोटेवर गणपती आणि लक्ष्मी यांचे फोटो लावण्यापर्यंत आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अघोषित शाखा असलेल्या 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल  Arvind Kejariwal  नी नोटेवर गणपती आणि लक्ष्मी ( Ganpati and Laxmi ) यांचे फोटो असावेत, अशी मागणी केली आहे. या मागणीला हिंदुत्वाच्या रक्षणकर्त्या भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. भारताच्या राजकारणात सध्या जखम मांडीला आणि मलम शेंडीला पर्व सुरू आहे. त्यात अखिल भारतीय जन मूर्खपणाचं सोंग घेऊन सामिल झालेले दिसत आहेत.

भारताच्या इतिहासात रूपयाच्या घसरणीने विक्रम केला आहे. इतिहासात कधी नव्हता इतका रूपया घसरला. मात्र देशातील सत्ताधारी पक्ष आणि मिडीयाने यासाठी पुन्हा नेहरूंपासून काँग्रेस पर्यंत सर्वांना बोल लावले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे अपयश सांगायला कोणी तयार नाही. पोपट मेलेला आहे, पण ते सांगण्याची हिंमत कुणात नाही. त्याचमुळे 'रूपया घसरत नाही, पण डॉलर मजबूत होतोय' असं अजब स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आणि देशातील सर्व बाजारबुणग्या माध्यमांनी ते स्वीकारलं. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर न बोलण्याची माध्यमांची भूमिका अनाकलनीय बिलकुल नाही. बदलत्या अर्थकारणामध्ये हे गृहीतच आहे. रूपयाच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. मात्र अशा वेळी अरविंद केजरीवाल सारख्या तैनाती फौजा तात्काळ सरकारच्या बचावासाठी धावून येताना दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच RSS प्रॉडक्ट आहे, अशी माझी ठाम धारणा आहे. गांधी हद्दपार करण्याची संघाची मोहीम ते राबवत आहेत. त्यांनी पंजाब आणि दिल्लीतील कार्यालयांमधून गांधीच्या तसबिरी हटवल्या. या निर्णयाला विरोध होईल म्हणून त्यांनी लगेचच डॉ. आंबेडकर आणि भगतसिंह यांचा सहारा घेतला. आता घसरत्या रूपयावरून जेव्हा केंद्र सरकार अडचणीत आहेत तेव्हा मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करून सगळ्यांचे लक्ष गणपती-लक्ष्मी यांचे फोटो आणि देशाचे ध्रुवीकरण या मुद्द्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. गांधींच्या फोटोमुळे भारतीय रूपया मजबूत होत नाही, हा प्रचार गेले कित्येक वर्षे संघपरिवारातील लोकं करत आले आहेत. अरविंद केजरीवाल ही याच अजेंड्याला पुढे घेऊन जात आहेत.

अरविंद केजरीवाल हे फक्त त्याच राज्यांमध्ये काम करतात, जिथे काँग्रेस स्वतःच्या हिंमतीवर मोठा सत्ता किंवा विरोधी पक्ष आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपा कमजोर तिथेच अरविंद केजरीवाल हजर असतात. अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदींनंतर सगळ्यात जास्त जाहिरातबाजी करणारे नेते आहेत. सामान्य पणाचा चेहरा दाखवून अरविंद केजरीवाल एक नवीन राजकारणा देशात रूढ करायला आले होते. त्यानंतर ते मुख्यप्रवाहातील राजकारण करू लागले. भाजपाच्या मदतीसाठी ते कायम हजर असतात. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव कापण्यासाठी लगेच मेक इंडीया नंबर १ यात्रा काढण्याची त्यांनी घोषणा केली होती. भाजपाविरोधी मतांमध्ये बुद्धीभेद करण्यासाठीचं अरविंद केजरीवाल हे अस्त्र आहे, असे माझे ठाम मत आहे.

तर असे हे संघर्ष के साथी अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेली नवी चर्चा ही भारताच्या हिंदू राष्ट्र करणाच्या प्रचारातील पुढचे पाऊल आहे. ज्या गोष्टी भाजपा करू शकत नाही, त्या गोष्टींची सुरूवात अरविंद केजरीवाल करतात. देशात बेरोजगारी वाढलीय, महागाई वाढलीय, धार्मिक-जातीय ध्रुवीकरण वाढलंय, अशा काळात विरोधी पक्षांचे काम आहे सरकारला धारेवर धरणे. मात्र या जबाबदारीतून स्वतःचा पाय मोकळा ठेवत अरविंद केजरीवाल यांनी आता हिंदू अस्मितेचा मुद्दा पेटवला आहे. गुजरात मध्ये भाजपच्या सरकारच्या विरोधात असंतोष आहे, अशा वेळेला तिथे मजबूत असलेल्या काँग्रेसकडे मते वळू शकतात. त्यामुळे काँग्रेसची विरोधी पक्षाची स्पेस काबीज करण्याची आप ची रणनिती आहे. दिल्ली, पंजाब तसेच इतर महत्वाच्या राज्यात अरविंद केजरीवाल ही स्पेस ताब्यात ठेवून आहेत. दिल्लीसारख्या राज्यात भाजपची इतकी दयनीय अवस्था असू शकेल यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? दिल्ली सारख्या राज्यात आप बसल्यामुळे त्याने राष्ट्रीय पातळीवरच्या विरोधी पक्षाची स्पेस काबीज केली आहे. मात्र आप हा राष्ट्रीय पातळीवर वाढत नाहीय. काँग्रेसला विरोधी पक्षाच्या स्पेस मधून बाहेर काढण्यासाठी 'आप'ची रचना आहे असं माझं ठाम मत आहे. काँग्रेस कमजोर आहे, मात्र भाजप मजबूत आहे. महाराष्ट्र सारखं राज्य आपच्या रडारवर का नसतं, राजस्थान मध्ये 'आप'ला आपली शक्ती का लावावी वाटत नाही? या सगळ्यांची उत्तरे शोधली तर ज्या ज्या वेळी काँग्रेस विरोधी पक्षाच्या स्पेस मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळी अरविंद केजरीवाल हे एक वेगळंच नॅरेटीव्ही सेट करण्याचा प्रयत्न का करतात? याचंही उत्तर सापडेल.

काँग्रेसला गांधीतेतर अध्यक्ष सापडला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पदभार स्विकारताच निवडणूक समितीची बैठक बोलवली आहे. 'भारत जोडो'चा प्रभाव वाढत चालला आहे. भारत जोडो चा प्रवेश आता मध्य आणि उत्तर भारतात होईल. अशा वेळी राम मंदिराच्या प्रवेशाची तारीख, नोटांवर गणपती-लक्ष्मी यांचे छायाचित्र अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत. या देशात ८० टक्के हिंदू राहतात. त्या हिंदूंचे रोजचे जगण्या-मरण्याचे प्रश्न वेगळे आहेत. महागाई- बेरोजगारीतून हिंदूंना मुक्ती नाही, सवलत नाही. अशा वेळी या देशाला धर्मवेडे बनवून मूळ प्रश्न आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांसाठी हे नालायक राजकीय पक्ष देवी-देवतांचे फोटो-नाव यांचा आधार घेत आहेत. धर्माची ढाल घेत आहेत. शहाण्या भारतीयांनी हा डाव ओळखला पाहिजे. राज्यघटनेच्या पानांवर रामायण-महाभारतापासून भारताच्या दैदीप्यमान आणि गौरवांकीत इतिहासाची मांडणी करणाऱ्या देशात धर्म कधी नागरी कर्तव्य किंवा राजकीय कर्तव्यांवर हावी झाला नव्हता. आज धर्माची अफू चाटायला देऊन देशाला गुंगीत ढकलण्याचे षडयंत्र सुरू आहे.

Tags:    

Similar News