राजकीय वर्तुळ

Update: 2018-07-17 03:47 GMT

मनसे पुन्हा जोरात…

जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना.. मनसे बाबत माझं काहीसं असंच मत आहे. निवडणूका जवळ आल्या किंवा सरकार धोक्यात आलं की हा पक्ष जागृत होतो. लोकांना वाटतं हे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ सारखं आहे, पण ते तसं नाहीय. हे काही बेगाने शादी में वगैरे सारखा प्रकार नाहीय. यात फार राजकीय लाभ नसला तरी मनसे ला काही ना काही लाभ होत असतोच. सध्या मनसेचं खळ्फट्याक टाइप आंदोलनं सुरू आहेत. मनसे ही राजकारणातील आयटम गर्ल आहे. जितका रोल दिलाय तितका ‘ देख ले , आँखो में आँखे डाल देख ले’ टाइप पूर्ण केला जातो.

एकीकडे राज्यातला शेतकरी दुधाला भाव मिळावा, शेतमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करत असताना मनसे पॉपकॉर्न च्या भावासाठी माऱ्यामाऱ्या करत होती. रस्त्यावरचे खड्डे बघून मनसेसम्राटांचं ह्रदय पिळवटून निघालं आणि त्यांनी पीडब्लूडीचं कार्यालय तोडण्याचा आदेश दिला. इतकंच काय रात्री मंत्रायलाच्या समोरचा फुटपाथ ही खोदून काढला. येत्या काळात मनसे अशाच पद्दतीचे ‘कार्यक्रम’ हाती घेईल. हेतू उघड आहे, शिवसेनेला त्रास देणं!

आता तुम्ही इतके दिवस कुठे होतात, अचानक कसे जागे झालात असा प्रश्न मनसे आणि मला दोघांनाही विचारू नका.. जे जे होतंय ते पाहत राहा. पब्लिसीटीसाठी जो पर्यंत खळ्ळफट्याक वाले हे लोक येऊन तुमच्या कानाखाली मारत नाहीत तो पर्यंत सर्व मूकपणे पाहत राहा.

दूध..दूध …

दरवर्षीप्रमाणे राजू शेट्टी यांचं हिंसक आंदोलन पु्न्हा सुरू झालंय. लक्ष आकर्षित करण्यासाठी राजू शेट्टी यांनी नेहमीप्रमाणए गाड्या पेटवणं, शहरांची रसद बंद करणं असे प्रकार सुरू केले आहेत. शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी या आधीही मुंबई आणि इतर शहरांचा भाजी-दूध पुरवठा बंद करण्याचं आंदोलन केलेलं आहे. रस्त्यावर भाजीपाला टाकणे-दूध ओतणे असे प्रकार करून सरकारचं लक्ष मूळ प्रश्नाकडे वेधण्याचा प्रकार आहे हा. प्रश्नच इतका ज्वलंत झालाय की आता शेतकऱ्याकडे या शिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नाहीय. तरीही दूध रस्त्यावर ओतणं हे जरा डिस्टर्बींग वाटतं. सध्या सत्तेपासून दूर गेल्यापासून राजू शेट्टी यांची अवस्था बिकट आहे. प्रश्न सोडवता येत नाही म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धूर्तपणा दाखवत शेतकरी संघटनाच फोडण्याचा प्रयत्न केला. पण याने प्रश्न तिथेच राहिला आणि राजकीय स्कोअरच जास्त झाला. शेतकऱ्यांच्या मागच्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा ही जास्त चर्चा राजू शेट्टी - सदाभाऊ खोत यांच्या वादाची झाली. यावेळीही सदाभाऊंना शेट्टी यांच्या अंगावर सोडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाला. पण तो तितका यशस्वी झाला नाही. देवेंद्र फडणवीस धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी जरूर आहेत पण ते आजारावर उपचार करण्यापेक्षा स्टीरिऑइडस देण्यावर जास्त भर देतात. अशा प्रकारात रूग्णाला तात्पुरतं बरं जरूर वाटतं पण त्याचे साइड इफेक्ट भयंकर असणार आहेत. फडणवीस यांना हे समजत नाहीय अशातला भाग बिल्कुल नाहीय, पण वेळ मारून नेण्यावर त्यांचा जास्त भर आहे, आणि हीच प्रवृत्ती त्यांच्यासाठी मारक ठरणार आहे.

दादांचं कमबॅक...

यंदाच्या अधिवेशनात अजित पवार जास्त आक्रमक होताना दिसतायत. अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर ते अजून पर्यंत बॅकफूटवर असल्याचंच चित्र बघायला मिळत होतं. सरकारच्या विरोधात उघडपणे फार बोलायचं नाही असंच काहीतरी त्यांनी ठरवून टाकलं होतं. त्यातच पक्षातही अजित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान मिळेल अशा काही घटना घडून गेल्यायत.भाजपच्या वाटेवर असलेल्या जयंत पाटलांचं अध्यक्ष बनणं, सुप्रिया सुळेंचं राज्यात अॅक्टीव्ह होणं, बारामतीत ही सर्व काही आलबेल नाहीय, अशा परिस्थितीत अजित पवारांचा कोषातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंच सध्या जाणवतंय. सध्या दादा पक्षातही एकाकी पडल्यासारखे दिसतायत. दादांना आता नव्या दमाची आक्रामक टीम बांघावी लागणार आहे, पण सध्या दादांच्या आसपास तेच ते पक्षातले ‘थकेले’ लोक दिसतात. कॉन्ट्रॅक्टर टाइप आणि झोलर नेत्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय. त्यांच्या ताब्यातून बाहेर पडून पक्ष जीवंत करणं हे मोठं टास्क आहे. मर्यादीत साधनांच्या आणि कुवतीच्या लोकांच्या भरवश्यावर दादा कमबॅक करायचा प्रयत्न करतायत, पण यंदा हे कमबॅक त्यांना त्रासाचं जाणार आहे.

Similar News