ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे 6 हजार मेट्रीक टन डाळ पडून – रावसाहेब दानवे
कोरोना संकटावरुन सध्या राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र सरकारला पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत सुमारे 1 लाख मेट्रिक टन डाळ देण्यात आली होती. पण ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वाटपाविना पडून असल्याचे दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या पत्रात ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने कोविड महामारीच्या कालावधीमध्ये देशाची खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर आणि आत्मनिर्भर भारत योजना ANB अंतर्गत मे आणि जूनसाठी ही योजना लागू केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या सामान्यांना प्रति व्यक्ती पाच किलो गहू किंवा तांदूळ तसेच एक किलो डाळ, एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत देण्यात आले होते. तसेच, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे प्रवासी मजूर दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेते होते त्यांना प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य आणि एक किलो डाळ देण्यात आली. होती.
आत्मनिर्भर भारत योजेनअंतर्गत १६ मेट्रिक टन डाळ आणि PMGKAY &२ मध्ये राज्याला १ लाख १ हजार ९३३ मेट्रिक टन अशी एकूण १ लाख १३ हजार ०४९ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्राला दिली होती. परंतु राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे काही टन डाळ शिल्लक राहिली. ही बाब राज्य सरकारने 6 एप्रिल २०२१ रोजी भारत सरकारला सांगितली. त्यावर भारत सरकारने त्वरित कारवाई करत १५ एप्रिल २०२१ रोजी राज्य सरकारला ही डाळ त्वरित सामान्यांना वितरित करण्यासाठी सांगितले. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने वितरणाची परवानगी दिली असताना इतकी डाळ शिल्लक राहणे हे महाविकास आघाडी सरकारचे निष्काळजीपणा दर्शवते असे दानवे यांनी म्हटले आहे.