'Times Now'चे वरातीमागून घोडे, बदलला 'अजेंडा'
Times Now या इंग्रजी चॅनेलचा अजेंडा तसा सगळ्यांना माहिती आहे. पण आता 2 मे रोजीच्या निवडणूक निकालाच्या दिवसाचा ‘अजेंडा’च चॅनेलने बदलला आहे.
देशात कोरोना संकट गंभीर होत असताना निवडणूक आयोग, मोदी सरकार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच सर्वच जण पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गर्क झाले होते. या काळात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रचार केला गेला, पण मुख्य प्रवाहातील मीडियीने नेत्यांच्या या कृत्यांमध्ये दुर्लक्ष करत केवळ राजकीय बातम्या देण्याचे काम केले. पण आता परिस्थितीत भीषण झालेली असताना इंग्रजी न्यूज चॅनेल Times Now ने पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे विशेष वार्तांकन न करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.
देशात कोरोनाचे संकट भयावह झाले असताना केवळ त्यासंदर्भातल्या बातम्या दाखवल्या जाणार आहेत, असे टाईम्स नाऊने स्पष्ट केले आहे. "देशातील कोरोना संदर्भातल्या बातम्या, रिपोर्ट्स, लसीकरण मोहीम, हेल्पलाईन बाबत माहिती, आरोग्यतज्ज्ञ तसेच मानसिक स्वास्थ्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा प्रमुख अजेंडा असेल. आमच्या दर्शकांना 5 राज्यांच्या निवडणूकर निकालाचे अपडेट्स आम्ही बातमी स्वरुपात देत राहणार आहोत," असेही टाईम्स नाऊने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे संकट गंभीर झाले होते. पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोणत्याही नेत्याने याकडे गांभिर्याने पाहिले नाही. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सुप्रीम कोर्ट, हायकोर्टांनी फटकारल्यानंतर केंद्र सरकारने कोरोना परिस्थिती हाताळण्यास सुरूवात केली. पण या काळात मुख्य प्रवाहातील अनेक चॅनेलचा अजेंडा केवळ या निवडणुकांचे कव्हरेज होते. आता सर्व निवडणुका झाल्या आहेत आणि 2 मे रोजी केवळ निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत, त्यामुळे केवळ 2 मेचे विशेष वृत्तांकन न करण्यातून टाईम्स नाऊला काय म्हणायचे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.