मुंबई – माध्यमांनी बातमीचं स्त्रोत तपासलं पाहिजे, मी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणाऱ असल्याचं निराधार वृत्त चालविणाऱ्या चॅनेलविरोधात दावा ठोकणार असल्याचा इशाराच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिलाय. मी काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना प्रत्यक्षात कधीही भेटलेली नाही, असा खुलासाही पंकजा यांनी केलाय. सांगलीच्या कुठल्या नेत्याच्या माध्यमातून मी काँग्रेसच्या या नेत्यांना भेटले याचे पुरावेच आता संबंधितांना कोर्टात सादर करावे लागतील, असंही त्या म्हणाल्या. मला जे करायचं ते डंके की चोट पर करेन, असा गर्भित इशाराही पंकजा यांनी यावेळी दिला.
माझ्या स्पष्टवक्तेपणामुळं, प्रामाणिकपणामुळं मी थेट लोकांशी संवाद साधते, त्यांच्यामुळेच माझं नेतृत्व आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगातच नाही. ज्यावेळी अशा चर्चा होतात. त्या प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येतं मात्र, प्रत्यक्षात पंकजा मुंडे येतच नाही. त्यामुळं अशा चर्चा होतात, त्यात माझा काय दोष ? यावर आमच्या पक्षानं उत्तर द्यायला पाहिजे की पंकजा मुंडे पात्र असतील-नसतील, हे उत्तर मी किती वेळा देऊ, असा उद्विग्न प्रश्नच पंकजा यांनी उपस्थित केला. मी राहुल गांधींना प्रत्यक्षात कधी पाहिलेलंही नाही, असा खुलासा पंकजा यांनी केलाय.
माझ्याविषयीची माहिती चॅनेलला कुणी दिली ? ही माहिती का दिली ? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला. माझ्याविषयी प्रश्न निर्माण केले जातात. मी राजकारण करेल किंवा नाही ? कधी करेल ? कुणाशी करेल हा विषय वेगळा आहे. राजकारण करतांना मी नेहमी स्पष्ट भूमिका घेतलीय. मला जे बोलायचं ते मी ठणकावून सांगेन आणि मला जे करायचं आहे तर ते डंके के चोट पर करीन, असंही पंकजा यांनी सांगितलं.
एखाद्या पदावर विराजमान असलेल्या माणसाकडे जर एखादी माहिती असेल, तर ती माहिती लपवून ठेऊन त्याचा राजकीय उपयोग करण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या भूमिकेशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळं मी प्रचंड संभ्रमात आहे. मी वीस वर्षात सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे. अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. मला विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर माझी पहिली मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. तेव्हा मी असं म्हणाले होते की, राजकारणामध्ये ज्या विचारधारांना समोर ठेवून मी राजकारणात आले. त्या विचारधारेशी जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीची तडजोड करावी लागेल. तेव्हा मी राजकारणातून बाहेर पडायला सुद्धा मागेपुढे मागेपुढे पाहणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे. आणि तो ब्रेक मी घेणार असल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं.
या सुट्ट्यांमध्ये मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे. जीवनातल्या सगळ्या संस्कारांवर विचार करणार आहे, आणि त्या वाटेवर मी आहे का ? हे मला तपासून बघण्याची गरज वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही. सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये हा कोणाकडे, तो कोणाकडे यावर मी उत्तर देणार नाही. मात्र, माझ्या पक्षप्रवेशाविषयी चुकीची बातमी देणाऱ्या चॅनेलवर दावा ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं.