तुमसर एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन ; आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांची चिंता वाढली
एसटी कामगार संघटनांनी संप मागे घेतला असला तरी एसटी कर्मचारी संपावर ठाम असून आंदोलन सुरूच आहे. एस.टीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र सदर आंदोलामुळे उद्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेवर परिणाम होणार आहे. एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.
उद्या ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परिक्षा राज्यभरात राबविली जात आहे. अनेक ठिकाणी बस बंद असल्याने काही परीक्षार्थी आजपासूनच आपल्या सोयीने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी येतांना दिसत आहे. तर काही परीक्षार्थी परिक्षेपासून वंचीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे काही आगारातूनही बसेस बंद असल्याने अनेक नागरिक खासगी वाहनाचा वापर करीत आहे. मात्र, खासगी वाहनधारक सुध्दा दुप्पट किंमत आकारत असल्याचे बोलल्या जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. याआधी आरोग्य विभागाची परिक्षा काही तास अगोदर रद्द करण्यात आली होती. मात्र, यावेळी तसेच काही पाऊल सरकार उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ऐन परिक्षेच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे , आंदोलक मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.