गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला "राईट टू लव्ह"ची नोटीस
गेल्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा गाव अनोख्या फतव्यामुळे चर्चेत आलं होतं. त्या गावच्या ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली आहे.;
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला होता. ही बातमी Adv. वैभव चौधरी यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी लगेच नानव्हा गावच्या सरपंचासह सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली. ही नोटीस नानव्हा ग्रामपंचायतीला मिळाली आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेम विवाहाला विरोध करण्यासारख्या घटना वाढत आहेत. त्यापार्श्वभुमीवर "राईट टू लव्ह" या संघटनेतर्फे या घटनेचा कडाडून निषेध करत आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रकरण ताजे असतानाच, गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं देखील आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर आणि असंविधानिक असल्याचे सांगत असा ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही, असं Adv. वैभव चौधरी यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधान आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार देतं. मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असला तरी. त्यात सरकारच्याही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना सदरच्या ठरवामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे. नानव्हा ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही आमच्या राइट टू लव्ह या संघटनेमार्फत नानव्हा ग्रामपंचायतीस कायदेशीर नोटिसी पाठवली असून 7 दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितल्याचे राईट टू लव्हचे के अभिजीत यांनी सांगितले आहे. तसेच नोटीसीमध्ये संबंधित ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व सभासदांवर व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.