रायगड जिल्ह्यासह कोकणात सलग दहा दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात विक्रमी ३०३ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.
बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पावसाने उग्ररूप धारण केले आहे. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत होते. सखलभागात पाणी साचले होते. वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडत होत्या. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. रात्री अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती.