“निसर्गाशी पंगा घेवू नका.”
लोणावळ्यात अख्खं कुटुंब वाहून गेलं… ताम्हिणी घाटात तरूण बुडून गेला… हे सगळं पाहून डाॅ. विनय काटे यांनी लिहिली एक पोस्ट आयुष्य वाचवण्यासाठी… नक्की वाचा आणि सावधान राहा…;
एक पोस्ट आयुष्य वाचवण्यासाठी…
2005 साली मिरज मेडिकलमध्ये असताना माझी वर्ग मैत्रीण होती मुंबईची चित्रा गुप्ता. माझा आणि तिचा रोल नंबर आडनावामुळे शेजारी होता म्हणून वर्गापासून परिक्षेपर्यंत सगळीकडे ती शेजारी दिसायची. पावसाळ्यात वर्गातल्या काही मित्रमैत्रिणीसोबत चित्रा ठोसेघरचा धबधबा पाहायला गेली. तिथे छोट्याश्या डोहात ती पोहायला येत नसताना उतरली आणि होत्याचं नव्हतं झालं. डोहात की प्रवाहात ती बुडाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी मिळाले तिचे प्रेत. मला ही बातमी कळली त्यावेळी मी गोव्यात होतो आणि त्यावेळी मला अश्रू आवरले नाहीत. चित्राच्या आईवडिलांनी तिच्या आठवणीत त्या धबधब्या शेजारी लावलेला बोर्ड आजही आहे.
चित्राच्या अपघातानंतर आमच्या कॉलेजने वर्षभर सहली बंद केल्या. त्यानंतर ज्युनिअर बॅचच्या मुलांनी खुप आग्रह करून एका बीचवर (बहुदा गोव्यात) सहल आयोजित करण्यासाठी कॉलेज प्रशासनाला भाग पाडले. त्या सहलीत मुलेमुली बीचवर पाण्यात खेळत असताना एका मोठ्या लाटेच्या फटक्यात सहासात मुले पाण्यात ओढली गेली. पुढच्या लाटेत त्यातली काही मुले बाहेर आली पण दोघेजण कमनशिबी ठरले आणि त्यांचा त्यातच अंत झाला. ही बातमी जेव्हा आम्हाला कळली तेव्हा मी आमच्या डीन सरांच्या बंगल्यावर त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी मी डीन सरांच्या डोळ्यात पाणी पाहिले होते.
गेल्या आठवड्यात लोणावळ्यात अख्खं कुटुंब वाहून जाताना, भुशी धरणात एक पट्टीचा खेळाडू बुडून वाहत जाताना जेव्हा व्हिडिओ पाहिले तेव्हा जुन्या वाईट आठवणी परत एकदा जाग्या झाल्या. पावसाळ्यात समुद्र, धबधबे, ओढे, नद्या ही निसर्गाची रूपे मोहक वाटत असली तरी ती प्रत्यक्षात अक्राळविक्राळ असतात हे वैज्ञानिक सत्य बहुतांश लोकांना माहीत नसते. पाण्याचा अगदी उथळ वाटणारा प्रवाह जेव्हा पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहतो तेव्हा तो गाडीची चाके आणि रस्ता यातले घर्षण संपवून टाकतो आणि गाडी अगदी कमी वेगात असतानाही पुलावरून, रस्त्यावरून अलगद खाली घसरत जाऊन मोठे अपघात होतात. एक्सप्रेस महामार्गावर स्पीड लिमिट ट्रॅफिकचे चलन काढण्यासाठी नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे हे समजून घ्या!
नदीत, धबधब्यात, ओढ्यात अगदी गुडघाभर पाणी असताना आपण खूप आनंदाने त्यात उतरतो, पण जेव्हा वर डोंगरात पाऊस सुरू असतो तेव्हा क्षणात flash flood येतो आणि आपल्याला वाहवून नेत संपवून टाकतो. धबधब्याखाली अंघोळ करताना जेव्हा पाण्याचा प्रवाह नव्याने सुरू होतो किंवा अचानक वाढतो तेव्हा वरून दगड निसटून खाली येतात आणि गुरुत्वाकर्षण आणि पाण्याच्या प्रवाहाच्या वेगासोबत ते अजून घातक बनत आपल्या डोक्याची कवटी फोडू शकतात... अगदी छोटे दगडसुद्धा! त्यामुळे कुठेही थेट वरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात खाली उभे राहणे हे मृत्यूला आमंत्रण आहे! पट्टीचे पोहणारे लोकही flash flood मध्ये पोहू शकत नाहीत!
तेव्हा सर्वांना विनंती आहे की पर्यटनाच्या, साहसी ट्रेकच्या, रोमांसच्या, थ्रीलच्या धुंदीत निसर्गाशी पंगा घेवू नका... निसर्ग physics च्या नियमांनी चालतो, आपल्या भावनांना तो किंमत देत नाही. भीती वाटणे हे आपले जीव वाचवणारे नैसर्गिक डिफेन्स तंत्र आहे. भीती वाटण्याची लाज वाटू देवू नका. निसर्गाच्या बाबतीत "डर के आगे जीत" नसते... मौत असते! स्वतःही समजून घ्या आणि आपल्या जिवलग लोकांना समजवा!!