रायगड : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड जिल्ह्यात मात्र संघर्ष निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर विळे भागाड एमआयडीसीमधील पॉस्को कंपनीवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. पॉस्को कंपनीबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
यामध्ये सदर कंपनीतील भंगार आम्हाला कोणत्याही अटीशर्ती विना समसमान विभागून द्यावे तसेच कंपनीतील अवजड वाहतुकीचे कंत्राट स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे अशा मागण्या या कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. पण या आंदोलनामुळे कंपनीमधून होणारी वाहतूक 15 दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत व्हावी अशी मागणी करत शिवसेनेने इथे आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीचे काही गुंडप्रवृत्तीचे लोक कंपनीची अडवणूक करत असल्याचा आरोप केला आहे.
2009 सालापासून सुरू असलेली कंपनी यापुढेही कायम सुरू राहावी व स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. पॉस्को कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामगारांचे हित डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी कंपनीला वेठीस धरत असल्याचा आरोप केला. पास्को कंपनीतील वाहतूक पूर्णतः बंद झाल्याने इथल्या स्थानिकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे स्थानिकांत असंतोष निर्माण झाला आहे.