कृषी कायदे : फक्त तर्क आणि तथ्यांवर चर्चेची तयारी : पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला महिना पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांवर खापर फोडले आहे.;
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला १ महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधी वाटपाच्या कार्यक्रमात कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकार कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चेला तयार आहे पण केवळ तर्क आणि तथ्यांच्या आधारावर ही चर्चा होईल अशी अटही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली आहे.
राजकीय अजेंडा असलेल्या व्यक्ती शेतकऱ्यांना सरकारशी चर्चा करु देत नाहीयेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारतर्फे १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी त्याचे पीक हवे तिथे विकू शकतो याच्या चूक काय आहे असा सवाल उपस्थित करत त्यांनी तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन केले.
शेतकऱ्यांनी नवीन कायद्यानुसार कॉन्ट्रक्ट फार्मिंग केले तर त्यांची जमीन हडप केली जाऊ शकते अशी खोटी भीती शेतकऱ्यांनी दाखवली जात असून गैरसमज परसवला जात असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. यावेळी पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केला. पीएम किसान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांना मिळू दिला जात नाही. तिथल्या शेतकऱ्यांचा आक्रोश कुणाला दिसत नाही पण केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात मात्र राजकारण केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.