"खा कडकनाथ...कोरोनावर कराल लवकर मात", ICMR ला शिफारस

महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात कडकनाथ कोंबडी घोटाळा गाजला होता. आताही कडकनाथ कोंबडी पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण जरा वेगळे आहे.;

Update: 2021-07-11 03:19 GMT

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचा अशक्तपणा लवकर जावा यासाठी अंडी, मांसाहार केला पाहिजे असे सांगितले जाते. पण आता कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांनी 'कडक' सूप घ्यावे अशी शिफारस म.प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्राने केली आहे. कृषी केंद्राने Indian Council of Medical Researchला ही शिफारस केली आहे.

कोरोना संकटाच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर सगळ्यांचा भर आहे. यासाठी अंडी आणि चिकन खाण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. मध्य प्रदेशच्या कृषी विज्ञान केंद्राने तर आता कडकनाथ कोंबडीचे मटन कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना द्यावे अशी शिफारस केली आहे. रंगाने काळ्या असलेल्या या कोंबडीचे मांस अत्यंत पौष्टिक असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.

कडकनाथ कोंबडीचे मांस हे अनेक प्रकारच्या प्रोटिन्सने युक्त असते. त्यामुळे रुग्णांना याचा चांगला फायदा होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. इतर कोंबड्यांच्या मांसात 25 टक्के चरबीचे प्रमाण असते, पण कडकनाथ कोंबडीच्या मांसात केवळ 2 टक्के चरबी असते. इतर कोंबड्यांमधून 18 ते 20 टक्के प्रोटीन्स मिळतात तर कडकनाथ कोंबीडच्या मांसात 25 टक्के प्रोटीन्स मिळू शकतात तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते, असे ही शिफारस करताना सांगण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. के.एस. तोमर यांनी ICMRला शिफारस करताना सांगितले आहे की, कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी आणि सूप हे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना लवकर सशक्त करण्यासाठी फायद्याचे ठरु शकते.

कडकनाथ कोंबडीची वैशिष्टे

कडकनाथ ही कोंबड्यांची जात आहे. कडकनाथ कोंबडीचा रंग पूर्णपणे काळा असतो. या कोंबडीचे रक्त आणि मांस पण काळेच असतात. साधारण कोंबड्यांच्या डोक्यावरील तुरे हे लाल असतात पण कडकनाथ कोंबड्यांचे तुरे हे काळे असतात.

मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये कडकनाथ कोंबडी प्रामुख्याने मिळते. भिल्ल आणि भिलाला जमातीमधील लोक प्रामुख्याने या कोंबडीचे सेवन करतात. या भागात या कोंबडीला 'काली मासी'ही असे म्हटले जाते. या कोंबडीचे GI मानांकन देखील मध्यप्रदेश सरकारने केले आहे. या कोंबडीची अंडी, मांस आणि सुप यातून इतर कोंबड्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स मिळतात, असेही सांगितले जाते.

Tags:    

Similar News