स्मार्ट सिटी परिसरातील खड्डे बुजवण्याचे महापौर ढोरे यांचे आदेश

Update: 2021-08-09 14:43 GMT




 ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्मार्ट सिटीचे काम चालू असून काही भागातील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून ते खड्डे त्वरीत बुजवावेत असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास दिले.

महानगरपालिकेच्या ड प्रभागामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण, वैद्यकीय, आरोग्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांबाबत नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली अधिका-यांसमवेत आज बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला व बाल कल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, नगरसदस्य बापु उर्फ शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, संदिप कस्पटे, तुषार कामठे, नगरसदस्या आरती चौंधे, निर्मला कुटे, अश्विनी वाघमारे, रेशा दर्शले, स्वीकृत सदस्य संदिप नखाते, महेश जगताप, प्रभाग अध्यक्ष उमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

नगरसदस्यांनी त्यांच्या समस्या महापौर माई ढोरे यांच्या समोर नमूद केल्या त्यामध्ये अतिक्रमणांची पाहणी करण्यात येऊन ती काढण्यात यावी, हॉकर्स झोन संदर्भात नियोजन करावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरण केंद्रे वाढवावीत, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, उद्यान विभागामार्फत झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, परस्पर झाडे तोडणा-यांवर कारवाई करावी आदी समस्यांचा समावेश होता.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या लोकप्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका घेत असून त्यामागील उद्देश शहरातील समस्या सोडविणे हा आहे. स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, उद्यान, पशुवैद्यकीय, जलनि:सारण आणि अतिक्रमण विभागांबाबत तक्रारींची संख्या जास्त आहे. त्यामुळे अधिका-यांनी लोकप्रतिनिधींच्या समस्याबाबत गांभीर्याने विचार करुन त्या त्वरीत सोडवाव्यात याबाबत ८ दिवसांनी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे याची दखल घ्यावी व त्यानुसार कारवाई करावी असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या


Tags:    

Similar News