Madurai Train Fire : लखनहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू; आगीचे कारण समोर आले
गेल्या काही दिवसांपासून देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरू आहे. त्यातच आता तामिळनाडूतील मदुराई येथे रेल्वे अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
मदुराई रेल्वे स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्याला आग लागली. रेल्वे डब्याला लागलेली आग खूप भीषण असल्याचे सांगण्यात येत आहे.
मदुराई स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्याला आग लागली. लखनहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनच्या पॅसेंजर डब्याला आग लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे ५.१५ वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने पोहोचून आग आटोक्यात आणली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
आगीच कारण आलं समोर
ट्रेनला आग लागल्याचा खुलासा दक्षिण रेल्वेने केला आहे. प्रवाशाने गुपचूप वाहून नेत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे ही आग लागल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वेने सांगितले की, खाजगी पक्षाच्या डब्यातील प्रवासी "बेकायदेशीरपणे" गॅस सिलिंडरची तस्करी करत होते आणि त्यामुळे आग लागली. डब्याला लागलेली आग भीषण होती, ती अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझवण्यात आली आहे.