मुलीच्या लग्नासाठी जमवलेले दागदागिने गेले, आता मुलीच्या लग्नात काय करावं? चव्हाण कुटुंबियांची कैफियत...
बाप अपंग, घर वाहून गेलंय, आणि मुलीचं लग्न... त्यात मुलीच्या लग्नासाठी केलेले दागीने गेले वाहून... पाहा चव्हाण कुटुंबाची ह्रदयद्रावक कहाणी...;
22 जुलै च्या जीवघेण्या रात्रीने शेकडो कुटूंब उध्वस्त झाली. जलप्रकोपाने अनेकांचे संसार मोडून पडले, दरड व महापुरात जीव वाचलेले लोक आता पुढे कसं जगावं? या चिंतेत जगत आहेत. पोलादपूर साखर सुतारवाडी येथील दरडीमध्ये सर्व कुटुंबियांची आयुष्य भरांची पुंजी हिरावुन नेली.
काबाडकष्ट करून पोटाला चिमटा काढून मोठ्या आशेने कमावलेलं सगळं गेलं. कोणाचं लग्न ठरलं होतं. कोणाच्या मुलाचा वाढदिवस जवळ आला होता. कोणी आपल्या बाळाच्या बारश्याची तयारी करत होतं. यात महापुराने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.
सुतारवाडीतील चव्हाण कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी दागदागिने केले होते. दरड व महापुराच्या संकटात आपल्या झोपडीत काहीच शिल्लक राहणार नाही. याची खात्री असल्याने चव्हाण कुटुंबाने एका सुताराच्या घरी दागिने ठेवण्यास दिले. मात्र ते घर पूर्ण दरडी खाली आलं, अन सारे संपून गेलं, बाप अपंग असल्याने आता पुन्हा हे दागिने कसे जमविणार, मुलीच्या लग्नाच काय होणार? या विचारांनी अन अश्रूंनी आईच्या मनात घर केलं आहे.
या संकटात पुन्हा उभे राहण्यासाठी कुणी तरी यावं अन् मदतीचा हात दयावा या अपेक्षेने ही आई, बाप व मुलगी जगत आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांना चहू बाजूंनी मदतीचा ओघ येतोय, पण आमच्या वेदनांवर फुंकर घालण्यास कुणी यावं ही आशा या मातेला आहे. चव्हाण कुटूंबीयांनी आयुष्यभर मोलमजुरी करून मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले दागीने या महापूरात वाहून गेले.
साखर सुतारवाडी या दरडग्रस्त गावात विठ्ठल चव्हाण हे दिव्यांग ग्रामस्थ राहतात. पत्नी सुनिता आणि एक मुलगी पुजा असं त्यांचं छोटसं कुटूंब आहे. घाटकोपर मुंबई येथे राहून लोकांच्या घरी धुणी - भांडी, मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. तिच्या लग्नासाठी दागदागीने तयार केले. कोरोनाच्या महामारीत मुंबई सोडून गावी परत आलेल्या या कुटूंबाकडे स्वतःचे चांगले घर नव्हते.
दरवाजे नसलेल्या पडक्या घरात राहत असताना चव्हाण कुटूंबीयांनी आपली आयुष्यभराची कमाई, दागदागीने शेजारी असलेल्या भरत सुतार यांच्याकडे ठेवायला दिली. साखर सुतारवाडी येथील दरडीत भरत सुतार यांचे संपुर्ण घर गेले. आणि या घरा सोबत सुनिता चव्हाण, विठ्ठल चव्हाण यांची आयुष्यभराची पुंजी, मुलगी पूजा हिच्या लग्नासाठी तयार केलेला दागीने वाहून गेले.
या धक्क्याने विठ्ठल चव्हाण आजारी पडले असुन सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दरडीने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. त्यांच्या पुढे आता अनेक प्रश्न आहेत. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटूंबाला आता आर्थिक मदतीची गरज आहे...
यांचे दुःख जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी