धक्कादायक – खंडणीसाठी तरुणाची हत्या, PPE कीट घालून मृतदेह जाळला
कोरोना काळात अनेक गुन्हे नवीन पद्धतीने घडत असल्याचे उघड होत आहे. पण उ.प्रदेशात मात्र PPE कीट आणि कोरोनाबाधीत मृत व्यक्तींसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगचा वापर हत्येसाठी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.;
2 कोटींच्या खंडणीसाठी एका 23 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. पण याहून धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी आपली ओळख पटू नये म्हणून पीपीई कीट घालून मृतदेहाची विल्हेवाट लावली, तसेच मृत व्यक्ती कोरोना रुग्ण होती, असे भासवून त्याचा मृतदेहदेखील जाळून टाकल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
कशी झाली सचिनची हत्या?
सचिन चौहान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिनचे वडील व्यावसायिक असून त्यांचा कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय आहे. 21 जून रोजी सचिनचे अपहरण झाले होते. त्याच दिवशी सचिनची हत्या अपहरणकर्त्यांनी केली होती. पण तरीही त्याच्या वडिलांकडून 2 कोटींची खंडणी मागण्याचा या आरोपींचा विचार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्येमध्ये सचिनचा जवळचा मित्र सहभागी असल्याचे उघड झाले आहे. 21 जून रोजी सचिनच्या मित्राने त्याला पार्टीसाठी बाहेर बोलावले. त्यानंतर एका बंद पडलेल्या पाणी प्रकल्पामध्ये त्याची लॅमिनेशन पेपरने तोंड दाबून हत्या केली. सचिन घरी न परतल्याने त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर फोन केला. पण फोन कुणीतरी दुसऱ्याने उचलून सचिन आता बोलू शकत नाही, असे सांगितल्याने त्यांच्या कुटुंबियांना शंका आली. त्यानंतर पोलिसांशी त्यांनी संपर्क साधला.
PPE कीट घालून मृतदेहाची विल्हेवाट
या हत्येनंतर आपण सापडू नये म्हणून या आरोपींनी आणखी एक घोर कृत्य केले. या सर्वांनी PPE कीट परिधान केले तसेच सचिनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा भासवले. त्यानंतर सचिनचा मृतदेह त्यांनी जाळून टाकला. यामुळे कोरोना महामारीच्या काळात आपला गुन्हा समोर येणार नाही, असे त्यांना वाटले. पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्याची उकल झाली आहे.