तलाठी परीक्षेचं सर्व्हर डाऊन, परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ, TCS ने दिलं स्पष्टीकरण

तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाल्याच्या दिवसापासून पेपर फुटल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच सोमवारी तलाठी भरतीच्या परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याची समस्या निर्माण झाल्याने नागपूर एमआयडीसी केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक झाल्याचे दिसून आले.;

Update: 2023-08-21 07:09 GMT

राज्यात 17 ऑगस्टपासून तलाठी भरतीची परीक्षा सुरू आहे. मात्र सोमवारी सकाळी तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर झाले. 9 वाजता पेपर सुरू होणार होता. मात्र 9 वाजल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच ठेवण्यात आले. त्यावेळी सर्व्हर डाऊन असल्याचे समोर आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला.

ऐनवेळी तलाठी भरती परीक्षेचे सर्व्हर डाऊन असल्याने नागपूरसह अमरावतीमध्येही विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यानंतर टीसीएसने आपली भूमिका मांडली आहे. आमच्या टेक्निकल टीमच्या म्हणण्यानुसार केंद्रीय हार्डवेअरचा प्रॉब्लेम झाल्याने 21 ऑगस्ट रोजी परीक्षा सुरू होण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे, अशी कबुली टीसीएसने दिली आहे.

2019 नंतर पहिल्यांदाच तलाठी भरती परीक्षा होत आहे. त्यामुळे यंदा 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यातच 17 ऑगस्टपासून राज्यभरातील विविध केंद्रांवर तलाठी भरती परीक्षा सुरू आहे. मात्र गुरुवारपासूनच तलाठी भरती परीक्षेच्या पेपर फुटीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोमवारी सकाळी ९ ची परीक्षा सर्व्हर डाऊन असल्याने १० वाजता सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.


Tags:    

Similar News