शिवसेना एकाच वेळी छत्रपती शिवाजी आणि विनायक सावरकरांच्या सोबत कशी?
राहुल गांधी यांनी " मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं वक्तव्य केल्यानंतर देशभर सावरकरप्रेमी आणि विरोधी आमने-सामने आलेत.राहुल गांधींची लायकी तरी आहे का, इथपासून ते गांधी हेच आडनाव उसनं आहे, इथवर हिंदुत्ववादी तुटून पडलेत. मुस्लिमांविरोधात कोणी काही गरळ ओकली की हिंदुत्ववाद्यांना मोठा आनंद होतो, हे लपून राहिलेलं नाही. एकवेळ गोहत्या झाली तरी चालेल, पण बुध्दिहत्या होता कामा नये, असं म्हणणारे विनायक सावरकर हिंदुत्ववाद्यांना प्रिय कसे, याचं उत्तर देत शिवसेनेने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेबाबत राज आसरोंडकर यांनी मांडलेले परखड विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पून्हा शेअर करत आहोत.;
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी " मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं वक्तव्य केल्यानंतर देशभर सावरकरप्रेमी आणि विरोधी आमने-सामने आलेत.राहुल गांधींची लायकी तरी आहे का, इथपासून ते गांधी हेच आडनाव उसनं आहे, इथवर हिंदुत्ववादी तुटून पडलेत. मुस्लिमांविरोधात कोणी काही गरळ ओकली की हिंदुत्ववाद्यांना मोठा आनंद होतो, हे लपून राहिलेलं नाही. एकवेळ गोहत्या झाली तरी चालेल, पण बुध्दिहत्या होता कामा नये, असं म्हणणारे विनायक सावरकर (VD Savarkar)हिंदुत्ववाद्यांना प्रिय कसे, याचं उत्तर सावरकरांच्या मुस्लिमद्वेषात आहे.
सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांचा मुस्लिमद्वेष पानोपानी ठासून भरलाय. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम पुस्तकरूपाने प्रकाशात आणणारे व त्यामुळे इंग्रजांचा रोष पत्करून अंदमानची सजा झालेल्या सावरकरांपेक्षा सहा सोनेरी पाने या पुस्तकात भेटणारे सावरकर हिंदुत्ववाद्यांना प्राणप्रिय आहेत. शिवाय, गांधीहत्येतील सहभागाच्या आरोपांमुळे हिंदुत्ववाद्यांमध्ये सावरकरांची स्वीकारार्हता मोठी आहे. शिवसेना हा राजकीय पक्ष स्वत:ला हिंदुत्ववादी समजत व तसं दाखवत आल्यामुळे हिंदुत्ववादी राजकारणाचं एक प्रतिक असलेले विनायक सावरकर शिवसेनेला जवळचे न वाटते, तरच नवल होते. राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना जनमानस सांभाळणं ही शिवसेनेची अपरिहार्यता आहे. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली. पण तीत एक गोम आहे.
"वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे" या वक्तव्यातील शिवसेनेची गांधीनेहरूंशी दर्शवली गेलेली जवळीक पुरेशी बोलकी आहे. शिवाय, आम्ही सावरकरांशी नातं तोडलेलं नाही, हा संदेशही दिला गेलाय.
तुलना करायचीच झाली, तर सावरकरांपेक्षाही शिवसेनेला पुजनीय आहेत, छत्रपती शिवाजी महाराज !!! शिवाजी महाराजांच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी त्यांची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. छत्रपती शिवाजी मात्र सर्वगुणसंपन्न होते. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले.
पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता, द्वेष, लंपटपणा अशा अवगुणांपासून छत्रपती शिवाजींचे जीवन अलिप्त होते. इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे. असे म्हणतात की शिवाजी स्त्रियांना अभय देतात, हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.शिवरायांचे हे स्त्रीदाक्षिण्य विनायक सावरकरांना सद्गुणविकृती वाटते. सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी तसं स्पष्टपणे मांडलंय. त्या पुस्तकातील सद्गुणविकृती या प्रकरणात सावरकर म्हणतात, शत्रुस्त्रीदाक्षिण्यासारखी राष्ट्रघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारच्या सहस्त्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे येथे दिल्यास अप्रस्तुत होणार नाही.
Shivsena Uddhav Thackeray how to stand same time with Chhatrapati Shivaji maharaj And VD Savarkarइथे सावरकरांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेचं उदाहरण दिलंय. शिवाय, मुसलमानी सुलतानांनी हिंदू स्त्रीयांच्या केलेल्या विटंबनेची आठवण शिवरायांना मुस्लिम स्त्रीयांचा गौरव करताना झाली नाही काय, असा सवाल उभा करून सावरकरांनी एकप्रकारे शिवरायांना आरोपीच्याच पिंजऱ्यात उभं केलं आहे.
शत्रुस्त्रीदाक्षिण्याच्या सद्गुणविकृतीपायीच शिवराय मुस्लिम स्त्रीयांवर प्रत्याचार करू शकले नाहीत, असा ठपकाही सावरकरांनी ठेवला आहे. इथे स्पष्ट होते की शिवरायांचं स्त्रीदाक्षिण्य, ज्यासाठी शिवरायांना जग खास करून ओळखतं, तेच सावरकरांना सद्गुणविकृती वाटते. परोपकार, दया, अहिंसा, परधर्मसहिष्णुता, शरणागताला अभय देणे, शत्रूवर उपकार करणे, परस्त्री अपहार न करणे, शत्रूस्त्रीदाक्षिण्य, आपल्या जीवावर उठलेल्या अपराध्यासही क्षमा करणे या सगळ्या सावरकरांच्या लेखी सद्गुणविकृती होत. शिवसेना परस्त्री सन्मान जपणाऱ्या शिवरायांसोबत आहे की शिवरायांच्या या स्वभावाला सद्गुणविकृती ठरवणाऱ्या सावरकरांसोबत, याबद्दल शिवसेनेने आपली भुमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे.