मशिदीवरील लाऊड स्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं

Update: 2023-05-27 03:59 GMT

मशिदीवरील लाऊड स्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. गेल्या वर्षी मशिदीवरील लाऊडस्पीकरमुळे वातावरण चांगच तापलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. "सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मशिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावू" असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान कांदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात हायकोर्टाची सुनावणी झाली. स्थानिक रहिवासी रिना रिचर्ड यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. तक्रार करून देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News