इंस्टाग्राम पोस्टवरून साताऱ्यात दोन गटात तणाव, खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट बंद
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत इंस्टाग्राम पोस्टवरून दोन गटात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.;
इंस्टाग्रामवर महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंटवरून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात रविवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात जमावाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत. त्यानंतर खासदार उदयनराजे आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच शांततेचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर पुसेसावळीत संचारबंदी तर संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यात इंटरनेटबंदी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.