CBSE ने फैज अहमद फैज यांच्या नज़्म अभ्यासक्रमातून हटवल्या

Update: 2022-04-24 08:36 GMT

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नवीन शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमात सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून प्रसिद्ध उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या नज्म हटवण्यात आल्या आहेत.

अनेक दशकांपासून फैज अहमद फैज यांच्या नज्म विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होत्या. त्यांच्या नज्म अभ्यासक्रमातून हटवल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. फैज यांच्या एका कवितेवरून आयआयटी कानपूरमध्ये गदारोळ झाला होता.

CBSE ने नवीन अभ्यासक्रमात पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांच्या नज्म 10 वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून आणि 11 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामची स्थापना, उदय आणि विस्तार याची माहिती असलेला अभ्यासक्रम काढून टाकला आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याचा कारभार आणि प्रशासनाचा एक पाठ देखील बदलण्यात आला आहे.

अभ्यासक्रमात केलेल्या या बदलांवर शिक्षकांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काही शिक्षक आणि पालक हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्याचा असल्याचं सांगत आहेत तर, कुणी यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टीपासून विद्यार्थी वंचित राहतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

याबाबत सीबीएसईच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही.

नक्की काय बदल करण्यात आला?

'लोकतांत्रिक राजनीति' या इयत्ता 10 वीच्या पुस्तकातील चौथं प्रकरण 'जात, धर्म आणि लैगिंक समस्या' यावर आहे. या प्रकरणात 'धर्म, पंथ आणि राजकारण' या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे.

सांप्रदायीक राजकारणाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुलांना तीन व्यंगचित्रे पाठ्यक्रमात देण्यात आली आहेत. पहिल्या दोन व्यंगचित्रांमध्ये फैजची प्रत्येकी एक कविताही लिहिली आहे. यामध्ये फैज यांच्या कविता असलेली पहिली दोन व्यंगचित्रे काढण्यात आली आहेत.

दुसरीकडे, इयत्ता 11 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून सेंट्रल इस्लामिक लँड्सचं प्रकरण काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात, आफ्रीका आणि आशियाई देशांमध्ये इस्लामिक साम्राज्याचा उदय आणि तेथील अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारे परिणाम सांगितले आहेत.

यासोबतच, जागतिकीकरणाचा कृषी क्षेत्रावरील परिणाम यावर भाष्य करण्यात आलेला भाग हटवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 12 वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून शीतयुद्धाचा काळ आणि नॉन-अलायन्ड मुव्हमेंट हे प्रकरण वगळण्यात आलं आहे.

केवळ इतिहास किंवा सामाजिक शास्त्र या विषयांचेच प्रकरण काढून टाकले किंवा बदलले गेले असे नाही. सीबीएसईनेही नवीन अभ्यासक्रमातील गणिताचे देखील प्रकरण हटवण्यात आले आहेत.

इयत्ता 11वीच्या गणिताच्या पुस्तकातून चार-पाच प्रकरणे काढून टाकण्यात आली आहे. CBSE ने मागील शैक्षणिक सत्र 2021-22 चा अभ्यासक्रम देखील बदलला होता. त्यानंतर मंडळाने 11वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून संघवाद, नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता यांसारखी प्रकरणे काढून टाकली होती, पण वाद निर्माण झाल्यावर ते पुन्हा समावेश करण्यात आला.

2012 मध्ये, NCERT ने इयत्ता 9, 10, 11 आणि 12 च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून सहा व्यंगचित्र काढून टाकले होते. त्याच वेळी, 2018 मध्ये, समीक्षा करून पुस्तकांमधील व्यंगचित्रांचे मथळे बदलले होते.

Similar News