प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया - मुख्यमंत्री
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाजी महापूजा केली. गेले दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पंढरपुरात दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' या दिंडीचा समारोप झाला.
आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' या उपक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंगांमधून दिला आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे.