सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाने मरण्यापेक्षा आता मराठा आरक्षणासाठी लढू आणि आरक्षण मिळवू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिलाय. पंढरपुरात छत्रपती शिवाजी चौकात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
न्यायालय अयोध्याचे राम मंदिराबाबत मध्यम मार्ग काढून निर्णय देऊ शकते तर मग आमच्या आरक्षणात खोडा का घातला जातोय, असा सवाल किरण घाडगे यांनी केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.