10 हजार कोटींचे पॅकेज हे राज्यातील शेतकऱ्यांना पुरेसं नाही- डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अतिवृष्टीनेबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, पॅकेज जाहीर झाल्यानंतर साधारणतः चार दिवसाने सातत्याने पावसाची जोरदार हजेरी लावली यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांचं सोयाबीन ,तुर पीक वाया गेलं. त्यामुळे सरकारने जाहीर केलेलं 10 हजार कोटींचे पॅकेज हे राज्यातील शेतकऱ्यांना पुरेसं नाही असं राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकं वाहून गेली आहे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि विशेषत: मराठवाड्यातल्या आणि अमरावती विभागामधील शेतकऱ्यांना अधिकचं पॅकेज कसं मिळेल यासंदर्भात सुद्धा आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि मागणी सुद्धा करणार आहोत. असं डॉ. शिंगणे यांनी म्हटले आहे.
जाहीर झालेलं पॅकेज ताबडतोप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत यासाठी सुद्धा निश्चितपणे प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगने यांनी दिली आहे.