'भक्त' हा भारत देशाला झालेला कॅन्सर - डॉ.प्रकाश कोयाडे
'भक्त' हा भारत देशाला झालेला कॅन्सर आहे! साधारणपणे दहा वर्षांपूर्वी याची लक्षणं दिसू लागली होती. आज या आजाराने देश पोखरला आहे. विविधतेत एकता, बंधुता, लोकशाही, माणुसकी हे या देशाचे अवयव निकामी होत आहेत... डॉ.प्रकाश कोयाडे यांनी केलेलं विश्लेषण..
'भक्त' हा भारत देशाला झालेला कॅन्सर आहे! साधारणपणे दहा वर्षांपूर्वी याची लक्षणं दिसू लागली होती. आज या आजाराने देश पोखरला आहे. विविधतेत एकता, बंधुता, लोकशाही, माणुसकी हे या देशाचे अवयव निकामी होत आहेत... डॉ.प्रकाश कोयाडे यांनी केलेलं विश्लेषण..
भक्तांची निष्ठा ही फक्त एका माणसाशी आहे. स्वतःच्या वडिलांना सुद्धा यांच्या आयुष्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थान आहे! 'मी काही भक्त वगैरे नाही पण...' हे वाक्य कानावर पडलं की समजून जायचं आजाराची लागण झालेली आहे. फेसबुक प्रोफाईलवर खाली कोपऱ्यात रामाचा मंदिरासोबत फोटो किंवा साधारणपणे प्रोफाईल लॉक ही यांची ओळख. यांची ताकद ही झुंडीमध्ये असते, एकटे असताना ही जगातील सर्वात पळपुटी जमात असते.
भक्तांची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आपली निष्ठा सोडली तर ते कोणाचेच नाहीत. काही काळापुरतं एखाद्याला आपलं म्हणायचं, त्या व्यक्तीचा आपला अजेंडा पुढे ढकलण्यासाठी वापर करायचा, ज्या दिवशी वाटेल की त्याचा वापर संपला त्या दिवशी त्या व्यक्तीला सोडून द्यायचं. सुशांत सिंग, अर्णब, वानखेडे, गोखले, तेंडुलकर हे सगळे भक्तांसाठी use and throw मटेरियल आहे.
काल शाहरुख ट्रोल झालाच पण सोबत रुबीका नावाची पत्रकारही ट्रोल झाली. ही तीच रुबिका आहे जीचा कालपर्यंत भक्त उदोउदो करत होते पण काल तीने सांगितले की, 'शाहरुख तिथे थुंकला नाही, ती एक दुवा करण्याची पवित्र पद्धत आहे'. एका क्षणात भक्तांनी तिला शिव्या घालायला सुरुवात केली. मागे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या एका अधिकाऱ्याच्या मुलीचं देश की बेटी म्हणून भक्तांनी कौतुक केलं, काही वेळातच तिच्या ट्विटर अकाऊंट वर सरकारची चिरफाड केलेल्या पोस्ट वाचून भक्तांनी तिला नीच पातळीवर जाऊन ट्रोल केलं. यावरून एकच सिद्ध होते की, ही जमात कोणाचीच नाही!
रोबोट चित्रपटात जशी एक 'रेड चीप' त्या रोबोटच्या शरीरात बसवून त्याला विध्वंस करायला सोडलं होतं तसंच 'देशभक्ती' नावाची चीप या भक्तांच्या डोक्यात बसवली, फक्त विध्वंस करणं हेच यांचं ध्येय आहे. जे आमच्या बाजूने तेच देशभक्त बाकी सगळे देशद्रोही... झोंबी बनले आहेत सगळे! काही ठराविक लोकच भक्त आहेत असं नाही तर पुरुष, स्त्री, तरुण, वृद्ध, सगळ्याच जाती-धर्मात, सगळ्याच व्यवसायात, सगळ्या थरातील लोक 'भक्त' या आजाराने ग्रस्त आहेत. समोरच्याला ट्रोल करण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात.
कितीतरी लोक जे एकेकाळी मित्र होते, नेहमी सोबत उठणं बसणं होतं, वैचारिक चर्चा व्हायच्या, बोलताना मतभेद व्हायचे पण भांडण कधी होत नव्हतं... ते आज एकमेकांपासून दुरावले आहेत. तिकडे हजार किलोमीटर दिल्लीत बसलेल्या माणसासाठी दहा वर्षे जुन्या वर्गमित्राला भांडणारी जमात या विकृत मानसिकतेनं तयार केली. स्वतःला विचारून बघावं की... या भिकार राजकारणापोटी एकेकाळी खास जवळची असणारी किमान एक व्यक्ती दूर गेली आहे.
बरं एक गोष्ट जरा बरी आहे की, काही भक्तांची भाषा थोडी बदलत आहे. म्हणजे कालपर्यंत भक्त असणाऱ्या काहीजणांचा बोलण्याचा सूर थोडा बदलला आहे, उदा: 'मी अशात राजकारणावर बोलणंच सोडून दिलं आहे' वगैरे. कॅन्सर काही प्रमाणात उपचाराने बरा होताना दिसतोय पण तरीही हे भक्त स्लीपर सेल सारखेच आहेत, ते कधीही पुन्हा एक्टिव होऊ शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसासाठी ही भक्ती सुरू आहे त्या माणसाला भक्तांशी काहीही घेणंदेणं नाही. त्या माणसाचा सगळा आटापिटा काळाच्या पटलावर स्वतःच्या नावाची मोहोर उमटवण्यासाठी सुरू आहे मग त्याचे परिणाम चांगले होवोत की देश खिळखिळा होवो. इकडे भक्तांच्या नोकऱ्या जावोत, चालून त्यांच्या पायांना भेगा पडोत किंवा भक्त भीकेला लागोत... त्या माणसाला काही फरक पडत नाही!
यांच्या कमकुवत मेंदूमध्ये धर्माची नशा पद्धतशीरपणे पेरण्यात आलेली आहे. क्रीडा, कला, लेखन, वाचन, मनोरंजन, विनोद यासारख्या सुंदर गोष्टी यांना वर्ज्य आहेत. त्यांनी स्वतःचं सुंदर आयुष्य नासवून घेतलेलं आहेच पण हीच कीड ते पुढच्या पिढीलाही लावत आहेत हे धोकादायक आहे. भक्तांना हे एक ना एक दिवस कळेल पण तेव्हा बराच उशीर झालेला असेल... तो शेवटच्या स्टेजमधील कॅन्सर असेल!
प्रकाश कोयाडे