जरा जपून...

Update: 2018-10-24 14:26 GMT

प्रतिभा ही कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेतलेली तरूणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यासारख्या मुक्त वातावरणात वाढलेली. तिने हाफ स्लिव्हचा टि-शर्ट घातलेला, स्वतःचा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंटस् वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच वर चढला. तुफान भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ - परिणाम आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे.

ऐश्‍वर्यसंपन्न कुटूंबातील प्रत्येकाला बंगल्यात स्वतंत्र खोली-टुमदार बंगला टोपे साहेबांनी बांधला खरा परंतू एकुलत्या एका मुलाला त्याच्या स्वतःच्या बेडरूममध्ये दिलेल्या इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून तो काय पाहतोय याकडे आई-बाबांचे दुर्लक्ष. विशाल नेटवर अश्‍लिल साईटस् पाहता पाहता घरात पैशांची चोरी करत वाममार्गाला लागला व गुप्तरोगाची शिकार झाला. यातून खचलेल्या विशालला मानसोपचारतज्ञांची उपचारपध्दती चालू आहेत.

मित्रांनो अशा अनेक घटना दैनंदिन जीवनात आपण ऐकत असतो. नैराश्येने पछाडलेली मेधा ध्यानवर्गासाठी आली होती. सुखवस्तू घरातील मेधा दिवसभर पती ऑफीसला गेले की, घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. सहजपणे चॅटींग करता करता एक तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असणारा मुलगा मेधाच्या प्रेमात पडला. टाईमपास म्हणून मेधाने त्याच्याशी गप्पा मारल्या खरा पण तो किशोरवयीन युवक एकतर्फी भावनेने तिच्यात फार गुंतला होता. शेवटी मेधाच्या घरात ही वार्ता कळाली. भांडणे, तू-तू, मैं-मैं, शिवीगाळ यातून मेधाच्या पतीने घटस्फोटाचा दावा देखील दाखल केला. मेधा आज नैराश्याने ग्रासली आहे. आत्महत्येचे विचार तिला सतावतात.

मोबाईल, इंटरनेट या खर्‍या गरजेच्या व उपयुक्त अशा गोष्टी यामुळे ज्ञानवृध्दी, जवळीक, प्रसिध्दी, व्यवसायवृध्दी, वेळेची बचत, जलद संवाद, ओळखी यासारख्या अनेक गोष्टी साधल्यामुळे जीवन सुखी व समृध्द होते. पण या दुधारी तलवारीसारख्या आहेत. मनावर संयम ठेवून नैतिक मुल्यांची जोड देऊन यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला खूप मदत मिळते पण जर मर्यादा न पाळता सीमारेषा ओलांडली तर मात्र आयुष्य कष्टमय व दुःखमय होण्याची दाट शक्यता असते.

चौदा वर्षांच्या रमेशला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. वडीलांनी मोबाईल हिसकावून अभ्यास करावयास सांगितले तर रागाच्या भरात रमेशने आत्महत्या केली. पुण्यात नुकतीच घडलेल्या या घटनेवर खूप गंभीर विचारमंथनाची गरज आहे.

बेंगलोर हे आय.टी. पार्क शहर बर्‍याचदा दोघेही संगणक अभियंता असल्यामुळे एकमेकांचे अकाऊंट हॅक करून पाहू शकतात. या शहरात मागील वर्षी इंटरनेट व मोबाईलच्या अती व असुरक्षीत वापरामुळे 4,192 घटस्फोटांचे दावे न्यायालयात दाखल झाले आहेत. केरळसारख्या सुशिक्षीत शहरात सायबर एक्स्पर्टस्च्या म्हणण्यानुसार 25% घटस्फोटांचे दावे हे आय.टी. क्षेत्रातील तरूण-तरूणींचे आहेत. भारत हा फेसबुकच्या वापरात दुसर्‍या क्रमांकावर असून 125 कोटी लोक याचा वापर करीत आहेत. किशोरवयीन मुले फेक प्रोफाईल्स् व पोर्नोग्राफीला बळी पडून असुरक्षिततेचे जीवन जगता जगता आत्महत्येपर्यंत वाटचाल करतात. याच्या अती वापरामुळे शारीरिक क्षमता बल कमी होते, डिप्रेशन, बोटांच्या संवेदना बोथट होणे, पाठदुखी, डोळे कोरडे होणे, मायग्रेन, टयुमर, निद्रानाश या सारख्या अनेक आजारांना तरूण पिढी बळी पडायला लागली आहे.

प्रत्येक गोष्टीची चांगली व वाईट अशी बाजू असतेच. आज तरूण पिढीने नेटचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करताना मनावर बंधने घालून वेळेचे भान ठेवावे. चॅटींग करताना सावधानता बाळगावी, पालकांनी आवश्यक त्या साईटस् ओपन ठेवून बाकी घातक अशा साईटस् ब्लॉक कराव्यात. मुले नेट वापरताना दुरून लक्ष ठेवावे. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, फिरायला जाणे, ग्रंथपुस्तके वाचणे, ध्यान करणे, निसर्गात भटकणे, आहार-विहार यावर नियंत्रण ठेवणे, एकमेकांशी सुसंवाद साधणे, आवडता छंद जोपासणे, नैतिक मुल्यांची वृध्दी करणे व माणसातील माणूस जागवणे या गोष्टींची आज समाजाला गरज आहे. त्यामुळे जे-जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा व जे-जे घातक आहे त्याचा त्याग करा.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना,

‘‘जनी वंदय ते सर्व भावे करावे,

जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे ।’’

Similar News