आंबेडकरी पक्षांचे महत्व फक्त निळ्या झेंड्या पुरतेच !

सामाजिक कार्यकर्ते आणि समाजवादी नेते राहुल गायकवाड यांचा लेख

Update: 2024-11-03 06:16 GMT

आपण आपल्यातील विस्कळीत झालेली शक्ती एकत्रित केली पाहिजे, खरे म्हणजे पराभूत सैन्याचा सेनापती असाच करतो, ” 1946 च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दादासाहेब गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात / म्हणतात.पराभूत अवस्थेतून उठून नव्याने उभा राहण्याचा संदेशच डॉ. आंबेडकर यांनी दादासाहेब गायकवाड यांना दिला होता. त्यामुळेच या नंतरच्या निवडणुकात पक्ष ताकदीने उभा रहिला, लढला. यामध्ये कधी यश तर कधी अपयश येत राहिले. पण यानंतर सतत आंबेडकरी विचार व पक्षाचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला. स्वतंत्र्य विचारधारा, जनतेच्या प्रति असलेली बांधिलकी व त्याबाबतचा स्पष्ट कार्यक्रम घेऊन हा पक्ष उभा राहिला. अन तो येणाऱ्या काळात या देशातील संसदीय राजकारणात सम विचारी पक्षासोबत आघाडी करून देशाचे नेतृत्व करेल, हा विश्वास आंबेडकरी विचार व राजकारणाने भारतीय जनतेला दिला होता. पण हे चित्र डॉ. आंबेडकर हयात असतानाचे व त्यानंतर एका दशकापर्यंतचे आहे.

मात्र आज या पक्षाचा निवडणुकांच्या मैदानात ना सहभाग आहे, ना समाजाच्या प्रति बांधिलकी. आंबेडकरी विचारांचे पक्ष केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.अस्थित्वहिन अवस्थेत आहेत. मात्र या ही अवस्थेत जे आंबेडकरी पक्षांचे गट विविध युत्या व आघाडयासोबत दिसत आहेत. ते केवळ निळ्या झेंड्यासाठी. डॉ. आंबेडकर व निळा झेंडा प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाला हवा असल्याने अस्थित्वहिन गट व त्यांच्या नेत्यांना डॉ. आंबेडकर व या निळ्या झेंड्यामुळे किंमत मिळत आहेत. ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षापासून राजकारणाची सुरुवात केली. कामगार वर्गासह मध्यम जातींना सोबत घेत डॉ. आंबेडकर यांनी १९३७ मध्ये राजकीय यश मिळवले. त्यावेळी मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये ११ जागांवर त्यांचा पक्ष विजयी झाला होता. परंतु, ब्रिटिश आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे डॉ. आंबेडकर याना शेड्युल कास्ट फेडरेशन ची १९४२ मध्ये स्थापना करावी लागली. शेड्युल कास्ट फेडरेशन चा झेंडा निळा आणि निवडणूक चिन्ह हत्ती होते. झेंडा आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी आंबेडकरी समाजात आजही तेवढेच स्थान ठेऊन आहेत, जेवढे डॉ. आंबेडकर यांच्या काळात होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह डॉ. आंबेडकर यांनी हत्ती आणि झेंडा निळाच ठेवला. आजही या निळ्या झेंड्याचे महत्व किती आहे, हे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष याना किती आहे, याची प्रचिती निळा झेंडा आपल्यासोबत असावा, यासाठी त्यानी निवडणूक काळात चालवलेल्या धडपडीतून दिसते. आज ज्या दोन्ही आघाड्या आंबेडकरी पक्षांना जे सामावून घेऊ पाहतात, ते फक्त निळ्या झेंड्यासाठी . कारण, समाजात निळा झेंडा समाजाच्या मनात आहे. बाकी, आंबेडकरी पक्षांचे अस्तित्व निवडणुकीत शून्यवत आहे.

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना राजकीय पक्षाच्या ज्या युती अन आघाड्या झाल्या आहेत. त्यात आंबेडकरी विचारांचे पक्ष आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीत ही अनेक पक्ष आहेत. पण प्रत्यक्ष निवडणुकीतील सहभाग शून्य. मविआला पण अनेक आंबेडकरी विचारांच्या पक्षानी पाठींबा दिला आहे. प्रत्यक्ष सहभाग शून्यच. बाकी अनेक आघाड्या झाल्या आहेत. प्रोग्रोसिव्ह आघाडी, रिपब्लिकन एकता आघाडी, आरक्षणवादी आघाडी, वंचित आदी बऱ्याच आघाड्या निवडणूक मैदानात असून या आघाड्यांनी 700 उमेदवार मैदानात उतरविले आहेत. या शिवाय अनेक उमेदवार अपक्ष लढत आहेत. मात्र आपण का लढतो आहोत ? हेच त्यांना माहित नाही. यातील काहीजण मत विभाजन करण्यासाठी उभे असून ते भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या मत विभाजन कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहेत.असे असताना निवडणुकीच्या मैदानात आंबेडकरी पक्षांचा सहभाग नाही, असे म्हणणे खरे तर धाडसाचे आहे. पण हा सहभाग वैचारिक पातळीवरील नसल्याने हे म्हणणे योग्यच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात कधी कुणाला सत्ता मिळवून देण्यात आंबेडकरी पक्षाने भुमिका बजावली, तर कधी कुणाला पराभूत करण्याची भुमिका बजावली.देशाच्या राजकारणात विशेष करून महाराष्ट्रात ही भुमिका आंबेडकरी पक्षाची विशेष करून राहिली. मात्र गेल्या दशकभरात आंबेडकरी विचारांचे पक्ष व समाज यामध्ये फार मोठी दरी निर्माण झाली असल्याने आंबेडकरी समाज,आंबेडकरी पक्षासोबत राहिलेला दिसत नाही. त्यामुळे पक्ष अन समाज दोघे ही अस्थित्वहिन झाले असून ही अवस्था अतिशय धोकादायक व चिंताजनक अशी आहे.

अन मग या धोकादायक व चिंताजनक अवस्थेत आज पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रातील संदेशाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. तो केल्याशिवाय आंबेडकरी विचाराच्या पक्षांची व आंबेडकरी समाजाची जी कोंडी झालीय, ज्या संभ्रमावस्थेत पक्ष व समाज आहे. त्याची कोंडी फुटून संभ्रमावस्था दूर करता येणार नाही.1946 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता , तरी पक्ष जिंकण्यासाठी व संसदीय राजकारणातील सहभागासाठी लढला होता. अन त्यावेळी संसदीय राजकारणातील सहभागा विषयी प्रचंड आत्मविश्वास ही होता. पण आज 8 दशकाच्या वाटचालीनंतर कसलाच आत्मविश्वास राहिलेला नाही. स्वबळावर लढण्याची ताकद नाही, त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती अन आत्मविश्वास ही नाही. झालेली कोंडी फोडायचा व संभ्रमावस्थेतून बाहेर पडायचा ही प्रयत्न होताना दिसत नाही. पण अशा ही अवस्थेत पुन्हा एकत्रित येण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा डॉ. आंबेडकर देत राहतात. इतकीच काय ती आंबेडकरी समाजाची आज जमेची बाजू आहे.अन ती कायमस्वरूपी पुरणारी आहे. ही प्रेरणाच ही कोंडी फोडू शकते. संभ्रमावस्था दूर करू शकते.

पण प्रश्न हा आहे की, ही कोंडी फोडायचा व संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न होतोय का ? तर याचे उत्तर नाही, असेच आहे. यासाठी पुन्हा आपल्याला त्या पत्रात डॉ. आंबेडकर दादासाहेब गायकवाड यांना म्हणतात त्याकडे लक्ष दिले पाहिजे. डॉ. आंबेडकर म्हणतात…. ” संयुक्त मतदारसंघ असल्याने सुवर्णं मतदारांनी शेड्युल कास्ट फेडरेशनला मतदान केले नसल्याने हा पराभव झाला आहे. ” हे खरे आहे. मात्र यावर मात करून पक्ष उभा करणे गरजेचे आहे. हे करण्यालाच कोंडी फोडणे असे म्हणतात.

सन 1946 ते 1956 या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच केले व या शेकाफ बरखास्त करून देशाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रूपाने एक नवा राजकीय पर्याय दिला.पण या पर्यायाचा राजकीय वापर न करता नेतृत्वाने स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केल्याने रिपब्लिकन पक्ष तर उभा राहिला, मात्र त्यातून आंबेडकरी विचार गायब झाला. अन त्यामुळेच कोंडी फुटायच्या ऐवजी अधिक घट्ट झालेली दिसते. ती इतकी घट्ट झाली आहे की, ती फोडण्याची इच्छाशक्ती ही आज कुठे दिसत नाही. त्यामुळे भरकटलेले कंपू ही स्वतःला आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून स्वतःला मिरवू लागले असून त्यांच्याकडे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव व निळा झेंडा वापरण्यासाठी त्यांची काहीतरी बोळवण सारेच प्रस्थापित पक्ष करताना दिसत आहेत. या होत असलेल्या निवडणुकीवरून नजर टाकली तर हे स्पष्ट दिसते.


Tags:    

Similar News