दरवर्षी भारतामध्ये थोर स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्या 14 नोव्हेंबर या जन्मदिनी ‘बालदिन’ साजरा केला जातो, ज्यांना मुलांचे प्रेम होते. मुलांचे हक्क, शिक्षण आणि कल्याण याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात बालदिन साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतभर मुलांसाठी अनेक शैक्षणिक आणि प्रेरक कार्यक्रम आयोजित केले जातात. बालदिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर 1959 रोजी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. 20 नोव्हेंबर 1981 रोजी बालकांच्या हक्क मसुद्यावर सदस्य देशांनी सह्या केल्या. या सनदेवर आतापर्यंत 191 राष्ट्रांनी सह्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी (युनिसेफ) ही संस्था जागतिक स्तरावर बालकांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी करत असते. बालदिन जागतिक स्तरावर विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना जगातील मानवकल्याणासाठी विविध कृतिकार्यक्रम, विशेष दिन राबवून मानवामध्ये जाणीवजागृती करत असते. उदा. जागतिक महिला दिन, एड्स सप्ताह, मानवी हक्क दिन, बालदिन इत्यादी. यांमध्ये एक दिवसापासून ते एक आठवडा, पंधरवडा, पूर्ण वर्ष, दशक इतक्या कालावधीत नियोजित कार्यक्रम साजरे करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला जातो. या कालावधीत निश्चित कृतिकार्यक्रम करून जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रांतून बालशिक्षणाबाबत आपले विचार मांडले आहेत. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षक यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी मुलांना ‘देवाघरची फुलेʼ मानली. ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे; देशाची खरी शक्ती व समाजउभारणीचा पाया बालकेच असतात, असे ते म्हणत.
बाल दिनाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीव-जागृती करणे, बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे, बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाण-घेवाण करणे, बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे, जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे, बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे, बालकांमध्ये ‘विश्वकुटुंबाची’ संकल्पना वाढीस लावणे ई. असे आहे.
बालदिनानिमित्त विभूतिपूजा टाळून, बालकांच्या गरजा व हक्क यांबाबत राष्ट्रातील पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली जाते. पंडित नेहरू यांचा धीरोदात्तपणा, वीरवृत्ती, असामान्य चरित्र व चारित्र्य, अथांग मानवता हे बालकांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जवाहरलाल म्हणजे ऋतुराज’. हा ‘ऋतुराज’ मुलामुलींमध्ये खुलवून त्यांचे जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी अशा दीपस्तंभाची गरज असते. ती भागविण्याचा येथे अल्पसा प्रयत्न सुरू आहे; परंतु आज शिक्षणपद्धतीकडे नेहरूंच्या दृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे नको त्या वयात नको ते गुन्हे बालकांकडून घडत आहेत. त्यांची मने ‘कोडगी’ बनल्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे, याची पालकांना जाणीव राहिलेली नाही. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण आपण संस्काराला कमी पडत आहोत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण, प्रादेशिक भाषेतील शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या; व्यापारी दृष्टिकोनातून शाळा काढून संस्थाचालक संस्थानिक बनले आहेत.
शिक्षक प्रशिक्षणाचा कणाच मोडला आहे. पूर्व माध्यमिक शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आज भ्रष्टाचार वाढला आहे. त्यासाठी चांगल्या चारित्र्याचे शिक्षक, पालक, संस्थाचालक, राज्यकर्ते इत्यादींची गरज आहे. त्यांची निर्मिती बालशिक्षणातून केली पाहिजे. केवळ ‘बालआनंद मेळावा’, ‘बालमहोत्सव’, ‘बालदिन’ या सारख्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे न करता त्यांतून मुलामुलींमध्ये कुटुंब, समाज, देश इत्यादींबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्यांप्रती उचित कार्य करण्याची प्रेरणात्मक शिकवण दिली पाहिजे. आज 14 नोव्हेंबर रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी सर्वांना ‘बाल दिना’च्या हार्दिक शुभेच्छा !
(Praveen M. Bagde)
Cell No. 099236 20919