भारतीय समाजात एक मोठी खोड फारा दिर्घकाल बसून राहिलीय. एखाद्या व्यक्तीचा आदर व सन्मान करायचा असेला तर त्याला अगदी " देव " करून टाकायचा. त्याच्या भोवती मोठे मायाजाल उभे करायचे . स्तुती गायची. जमलेच तर गळ्यात हारतुरे घालायचे. जे काही करता येईल ते सारे करायचे. पण...व्यक्तीला " माणूस " म्हणून समजून घ्यायाच नाही . त्याला / तिला देव / देवता बनवणे अगदी सोपे असते. पण " एक माणूस " म्हणून त्यांच्याशी योग्य व्यवहार करणे मात्र कटाक्षाने टाळले जाते. विशेषतः स्त्री समाजाबाबतीत तर हे चित्र सर्रास आढळते.
स्त्रीसमाजाचे दैवतीकरण...हा एक मोठा गंभीर असा विषय आहे. ज्या स्त्रीला व्यवहारात अक्षरशः पावलापावलावर कुचलण्याची एकही संधी इथली पुरुषसत्ताक व्यवस्था सोडत नाही तीच अमानुष व्यवस्था स्त्रीला जेव्हा देवता म्हणून भजू लागते तेव्हा ते " गौडबंगाल " नीट समजून घ्यायला हवे. आमच्या संस्कृतीत स्त्री म्हणजे भूमाता आहे , देवी आहे असे उच्चरवाने सांगितलं जाते. याकरिता मग अनेक देवता म्हणून गणल्या गेलेल्या काही स्त्रीयाचे दाखले दिले जातात. हा खरेतर " खोट्या गौरवीकरणाचा भाग " आहे. वास्तविक आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा खरे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतेच. आजही सीतेला इथला राम पावलापावलावर " अग्नीपरीक्षा " द्यायला लावतो , द्रौपदीचे " वस्त्रहरण " अगदी जाहीरपणे केले जाते , सती म्हणून तिच्या करता कायमची " चिता " पेटलेली असते , अहिल्या बनून " शिळेचे जगणे " तिच्या वाट्याला कायमचे आलेले असते. ती जेव्हा गार्गी बनून इथल्या याज्ञवल्क्याला आव्हान देते तेव्हा आजही याज्ञवल्क्याची औलाद तिला " जीभ छाटली जाईल " असे भरसभेत सुनावतो. नुसते मनात काही शृगारीक आले म्हणून इथल्या रेणुकेला स्वतःच्या पतीच्या आज्ञेनुसार अमानुष परशुराम मुंडके छाटायला तयार असतो. पावलोपावली जिथे अवहेलना व अवमानाच्या राशी स्त्री समाजाच्या वाटेवर सहज दिसतात तिथे " स्त्री दैवतीकरण " हा एक कुटील डावं आहे हे ओळखायला हवे. एकदा का तिचे गौरवीकरण तिला पटले की मग पुरुषसत्ताक अॉक्टोपस सर्व दिशांनी तिची कुचंबणा करायला मोकळा . या कुचःबणा म्हणजे तोंड दाबून मुका मार असतो. एका बाजूला स्त्रीची आरती ओवाळायची अन् तिची पाठ फिरताच तीच आरती तिच्या करता " हुंडाबळी " करून टाकायची असा हा व्यवहार आहे. मुख्य प्रश्न असा की , खरोखरीच पुरुषसत्ताक समाजाची ही अमानुष खेळी स्त्री समाजाला समजलीय का ? काही जणीना समजलय त्या या व्यवस्थेविरोधात आपला आवाज उघडतात . ज्यांना हे समजलेच नाही त्या खोट्या गौरवीकरणाला बळी पडून त्याच व्यवस्थेच्या वाहक बनतात आणि दुर्दैवाने ही संख्या फार मोठी आहे हे कबुल करावे लागेल. जो खरा विवेकी मनुष्य आहे आणि जो स्त्री पुरुष समानतेच्या बाजूचा आहे तो मनुष्य स्त्री दैवतीकरण करत बसणार नाही . याऐवजी तो मनुष्य तिच्या रास्त हक्क व अधिकारासाठी तिच्या बरोबर तिच्या संघर्षात उभा राहील. मला हे योग्य वाटते ....तुम्हाला ??
माणसांनो...१९९५ बिजींग परिषद भरली तेव्हा तिचे घोषवाक्य होते " आम्ही माणूस आहोतं " . वीस वर्षे होऊन गेली तरीही स्त्रीला आपण " माणूस " मानायला तयार नाही . हे आपल्या असंस्कृतपणाचे लक्षण आहेच पण त्याहीपेक्षा ते आपल्या हरामखोरीचे चिन्ह आहे हेच खरे. स्त्रीचे दैवतीकरण करून तिला फसवणूक करणेपेक्षा तिला माणूस समजून माणसासारखा व्यवहार करणे हेच उचित आहे....विचार तर कराल.
!!स्त्री दैवतीकरण थांबवा....तिला " माणूस " म्हणून समजून घ्या !!