मासिक पाळी ही नैसर्गिक आहे... असं बोलणारे आपण नेहमीच पाहतो... मात्र या नैसर्गिक पाळीला नैसर्गिकरित्या आत्मसात करण्यास कुणीही तयार नाही. यात फक्त पुरुषचं नाही तर काही महिला देखील आहेत. महिलांनाही वाटत असते की आपल्याला येणारी मासिक पाळी ही विटाळ आहे, अशा स्थितीत देवापुढे किंवा शुभ कार्यास गेल्यास अपशकुन किंवा अनर्थ होईल असे मानणारी मानसिकता आजही आपल्या समाजात आहे. काही क्वचित महिला आहे ज्या या परंपरा, रुढीला मानत नाही.
काही उच्चशिक्षित, डॉक्टर महिला यांसारख्या अनेक जणी अजूनही या मासिक पाळीवरुन पसरलेल्या अंधश्रद्धेला मानत आहे. पाळी आली की देवाऱ्यात जायच नाही... नाहीतर देवाचा कोप होईल असे जे काही विचार अजूनही आपल्या अवती-भोवती फिरत आहेत. त्या विचारांना नष्ट करण्याची गरज आहे.
आता वळुयात मासिक पाळी म्हणजे काय...
मासिक पाळी जी वयाच्या 12 व्या वर्षापासून मुलींना येते. यात महिन्यातील पाच दिवस मुलींच्या योनीतून रक्तस्त्राव होत असतो. पहिल्यादा ही पाळी येते त्यावेळी काही समाजात जल्लोषाने लग्नसोहळ्यासारखे कार्यक्रम केले जातात. मात्र काही महिन्यांनी ती पाळी या समाजाच्या डोळ्यात खुपू लागते. मग त्यात घरचेही सामील होतात.
पाळी आली की एका जागी बसून राहायचे... स्वयंपाकघरात जायचे नाही. एकंदरित महिन्याच्या पाच दिवस ती मुलगी किंवी महिला वाळीत टाकल्यासारखे असतात. आता तुम्हीच बघा, ज्या पाळीपासून तुमच्या घरात नवीन जीव जन्माला येतो... मुलगा किंवा मुलगी मग ती पाळी विटाळ करणारी कशी ठरु शकते.
आपल्या समाजात मनुस्मृती फक्त नावालाच दहन झाली आहे. कारण आजही मनुस्मृतीचे विचार समाजात देवाण-घेवाण करत आहे. त्याचा एकतर्फी प्रसार सुरुच असल्यासारखे चित्र समाजात पाहायला मिळतेय. या समाजाला मासिक पाळीचे नाही तर अंधमानसिकतेचा विटाळ लागलाय... म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला हेच सांगणे आहे की आपली मासिक पाळी विटाळ नाही तर निर्सगाने दिलेलं वरदान आहे... ज्यापासून या जगाची निर्मिती होत आहे.
प्रियंका आव्हाड