माणसाला मुक्त जगायला आवडते. मनात येईल ते करायला आपण मोकळे असायला हवे असे त्याचे स्वतः बद्दलचे मत असते. मी स्वतः ही याच मताचा आहे. जे मुक्त जीवन मला प्रिय आहे ते माझ्या घरातील व समाजातील स्त्री वर्गाच्याही वाट्याला यावे असे आपल्या वर्तनात उमटणे अत्यंत महत्त्वाचे आसते. सातच्या आत घरात हा नियम फक्त स्त्री वर्गाला आपण लागू कैलाय याची जाणीव हवी.जे जीवन जगण्याचा अधिकार व हक्क मला आहे तोच माझ्या परिवारातील व समाजातील प्रत्येक स्त्रीला आहे असे मानणे व वर्तन करणे आवश्यक असते.
स्त्रीयांनी आपल्या मर्यादेत रहावे...असे बिनदिक्कतपणे व सहज आपण बोलून जातो. मुख्य म्हणजे या मर्यादाही आपणच तिला ठरवून देतो. अगदी वेशभूषेपासून ते इतर छोट्या छोट्या गोष्टीतही " ठरवून दिलेल्या मर्यादेत " स्त्रीने आचरण करावे अशी समाजाची अपेक्षा असते. स्त्री म्हणजे खानदानकी इज्जत वगैरे भंपक वाक्ये यातूनच तयार होतात. शेवटी ती स्त्री आहे व तिला काही अंगभूत नैसर्गिक मर्यादा आहेत म्हणून तिला काही जादा नियम समाज लावतो. शेवटी हे तिच्या भल्याकरताच आहे अशीही बाजू सावरली जाते समाजाकडून. पण खरोखरीच अगदी मनापासून विचार करा...स्त्री इतकी दुर्बल असते का ? प्रत्येक जादा नियम तिच्या वाट्याला का ?? तिचे आचरण नेहमी " चाकोरीबध्द " असावे अशी अपेक्षा आपण का करतो ??? तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार व हक्क आहे की नाही ?? हे प्रश्न पडायला हवेत. तिने कोणत्या शाळेत जावे इथपासून ते घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय तिने घेण्याची तिला नसलेला अधिकार इथपावेतो तिची होता होईल तेवढी घूसमट व कुचंबणा आपण यथाशक्ति करत असतो.घरच्या मुलीने संध्याकाळी सातच्या आत घरी यावे हा नियम घरच्या मुलाला मात्र अजिबात ला होत नसतो. ( तो मुलगा " खानदानकी इज्जत " नसावा बहुतेक ) आपल्या मुलीच्या वर्तनावर पालक अधिक काटेकोरपणे लक्ष देतात कारण चुकून तिचे पाऊल वाकडे पडले तर समाजात छिःथू ठरलेली असते. या भीतीपोटी स्त्री समाजाच्या वाट्याला अधिकाधिक मर्यादा येत गेल्या व मुक्त जगणे कठीण होत गेले. कधीतरी शांत मनाने यावर विधायक विचार करणे व त्यानूसार कृती घडणे गरजेचे आहे . कुटुंबात आखलेल्या मर्यादा या मुलगा व मुलगी या दोघानाही समान हव्यात. पालकांचे लक्ष मुलीएवढेच मुलावरही हवेच. पाय त्याचाच अधिक घसरण्याची शक्यता असते. समाजाची वाटणारी भीती फेकून देऊन आपण आपल्या मुलीला मुक्त जगणे देण्यासाठी पालक म्हणून पुढे यायला पाहिजे . " सुजाण पालकत्व " हे कौशल्य आहेचा पण काळाची सर्वात मोठी गरज आहे.
माणसांनो...नियमाचा काटेकोरपणा केवळ स्त्री वर लादून तिला तिच्या नैसर्गिक जगण्यापासून संकुचित करणे हे निश्चितच योग्य नाही . तिला सतत वेगवेगळ्या नियमाखाली डांबून तिच्या नैसर्गिक ऊर्मी फुलण्याआधीच खुडून काढणे योग्य नाही . मूळ समस्या ही आहे की , स्त्रीने मुक्त जीवन जगावे असा विवेकी समाज व वातावरण आपण आजवर तयार करु शकलो नाही .वाटचाल त्या दिशेने चालूच हवी पण दुसऱ्या बाजूने स्त्रीवरील बंधनेही हळुवारपणे सोडवत नेऊया..,तिला फुलण्यासाठी अवकाश प्राप्त करून देऊया....एवढेच सांगणे.
!! नियमाचा बडगा उगारुन...स्त्रीत्वाच्या मूळ प्रेरणा मारु नका !!