बा...ई...प...ण ( भाग २ )

Update: 2018-10-27 13:40 GMT

मनुष्य स्वभावाचा एक भाग आहे की , मनुष्याला " गुण गौरव " झालेला आढळतो. शाळेत जाणाऱ्या लहान मुलापासून ते अगदी म्हातारे झालेल्या लोकांनाही जेव्हा समाजाकडून काही विशिष्ट बाबतीत शाबासकी मिळते तेव्हा ते आनंदित होतात. हे नैसर्गिक आहे. काही जणांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचि भावनाही मनात तयार होते. हे गुणगौरव अथवा मानसन्मान मोठी कामगिरी बजावत असतात हे मान्य व्हावे. आता समजा , कोणत्याही कारणाने जेव्हा जीवनात " हेटाळणी " वाट्याला येते तेव्हा काय होते ? मनं निराश बनते , मृत्यू जवळ हवा वाटतो . ही अशी हेटाळणी वाट्याला आलेल्या स्त्री समाजातील काही स्त्रीयाचा इथे जाता जाता थोडा विचार करु..

हेटाळणी आणि स्त्रीसमाज....तसे पाहिले तर पावलापावलावर स्त्री जीवनात हेटाळणी ठाणं मांडून बसलेली आहे.धार्मिक कार्यात येणारे दुय्यमत्व , सामाजिक अवहेलना ,सांस्कृतिक टोचणी , शैक्षणिक अडचणी , आर्थिक कमजोरी वगैरे मार्गातून वेगवेगळ्या रुपातून हेटाळणी स्त्रीला गवसणी घालत असते.पण हे सारे तिने या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर . स्त्री जन्माला येऊ नयै म्हणून कोणताही नवस फळत नसला तरीही खुद्द स्त्रीच देव नावाच्या अस्तित्वात नसलेल्या रचनृकडे मुलगा व्हावा असा नवस करते . अशावेळी तिने स्वतःच्या अस्तित्वालाच गहाण ठेवलेले असते.खुद्द धर्मग्रथातही " अष्टपुत्र सौभाग्यवती " असे आशिवचन लिहून स्त्रीचि हेटाळणी भक्कम केली. एकापाठोपाठ जेव्हा दोन अथवा तीन मुली जन्माला येतात तेव्हा आईवडील व नातेवाईक हे ठरवून शेवटच्या बाळाचे नाव " नकूशी " असे ठेवतात. याचा सरळ अर्थ असा की , तू आम्हाला नको होतीस. या " नकूशीच्या पाठीवर " जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा ते अपत्य अत्यंत लाडावलेले असते यात वाद नाही . परंतु ...कधीतरी एक जबाबदार व विवेकी व्यक्ती म्हणून आपण " नकूशीच्या हृदयात " उतरुन पहायला हवं. जेव्हा हे बाळं एकटे असेल तेव्हा त्याला आपल्या नावाविषयीची " योग्य माहिती " कळताच किती तिचे हृदय विदीर्ण होत असेल ?नकूशी या नावानेच तिचे समाजातील अस्तित्व दुय्यम बनवून टाकलेले असते. प्रतिकाराची कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने नकूशी या नावाबरोबरच हेटाळणी तिच्या जीवनात कायमची स्थिरावते. या पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वाने " आपल्या जवळच्या लोकांना " अजिबात आनंद झाला नाही उलट दुःख अधिक पोचले ही भावनाच तिला पावलापावलावर मृत्यू देत असते. यातूनच न्यूनगंड तयार होतो . आज समाजात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री वाटचाल करतेय असे म्हणतात. मग प्रश्न असा की , कतृत्ववान स्त्रीयांच्या यादीत " नकूशी " हे नाव का सापडत नाही ??याचे सरळ उत्तर असे की , तिच्या अंगभूत कतृत्वाला नकूशी या नकारात्मक हेटाळणीने कायमचे ग्रासलेले आहे. समाजात फार कमी स्त्री वर्ग नकूशी या नावाने जगत असेल हे मान्य मला. परंतु म्हणून त्यांच्या फुलण्याच्या वाट्याला लावलेल्या सुरुंगाबद्दल ब्र काढू नये असे नव्हे. " नकूशी " हे नाव व त्यामागील हेटाळणीची भावना पृथ्वीवरुन लौकर संपुष्टात यावे हिच सदिच्छा .

माणसांनो....या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार सर्व किड्यामुंग्याना असतो. मग स्त्री नावाचा जिवंत देहच सतत मृत्यू का कवटाळतो ? किड्यामुंग्यातही असे नकारात्मक भावनेचे नाव शोधून सापडणार नाही मग हे हेटाळणीयुक्त नांव भारतीय स्त्रीच्या वाट्याला का व कशासाठी ? जरा विवेकाने विचार व्हावा. जीवनात अशी एखादी नकूशी समोर आलीच तर....तर जी व्यवस्था तुम्हाआम्हाला गौरव प्राप्त करुन देते तिची ही " काळी बाजू " तुमच्या ध्यानात यावी. या नकूशीला मनातून प्रामाणिकपणे " सॉरी " म्हणा. समाजातील व्यवस्थेने केलेल्या या अपराधात तुमच्या आमच्या सारख्या सुसंस्कृत लोकांचाही कळतनकळत सहभाग असतोच म्हणून . मला एका नकूशीला मनापासून सॉरी बोलायचे आहे. तुम्हाला ???

!! हेटाळणी युक्त नावे...स्त्री समाजाचि बदनामी आहे !!

 

Similar News