बा...ई...प...ण ( भाग १४ )

Update: 2018-12-09 08:42 GMT

वर्षानुवर्षे मानवी समाजात काही प्रतिमा ठसल्यात. मनुष्य सज्जन म्हटला की तो नीटनेटका कपडे करणारा व गोड बोलणारा असावा लागतो. मनुष्य टपोरी म्हटला की त्याच्या शर्टाचे बटण उघडे आलेच आणि तोंडात काहीतरी असलेच पाहिजे . अशा काही प्रतिमा दृढ असतात आणि समाजमान्यही. अशाच काही प्रतिमा स्त्री समाजाच्याही ठरालेल्या आहेत. डोक्यावर नीट पदर घेणारी स्त्री ही अत्यंत सालस असते तर जीन्स घातलेली स्त्री कितीही सालस वागत असली तरीही ती बरेचदा केवळ फँशनेबल म्हणून ओळखली जाते. या प्रतिमा खरोखरीच सत्य दाखवतात का ??

स्त्री प्रतिमा....हा दखल घेण्याजोगा विषय निश्चितच आहे. साडीत वावरणारी स्त्री अधिक मान्यता असणारी तर ड्रेस वापरणारी थोडी कमी मान्यता असणारी तर जीन्स घालणारी फारच कमी समाजमान्य असते. लोकांच्या मनात विवाहित स्त्री विषयी काही कल्पना दृढ असतात. वरीला वर्णनात ते आढळते. विवाहित स्त्री जर जीन्स घालून रस्त्यावर जाऊ लागली तर लोकांच्या भुवया टराटर ताणतात. याउलट साडीतील विवाहित स्त्री त्यांच्या नित्य परिचयाची असते. ( तिला पहायालाही नजरा वर उठतातच ) इथे मुद्दा कपडे परिधान करण्याचा नाही . तर समाजमनात ज्या कल्पना दृढ होऊन समाजमान्य झाल्या आहेत आणि समाजाचा बराचसा व्यवहार त्याबरहुकुम होत असतो त्याचा मुद्दा मुख्य आहे. विवाहित स्त्रीने कसे वागावे , कसे चालावे , कसे बोलावे याचे काही संकेत ठरलेत. ते योग्य की अयोग्य याची चर्चा समाज फारसा करत नाही . फक्त त्यानुसार वर्तन घडते की बिघडते हेच मुख्य पाहिले जाते. याचकारणाने घरगुती समारंभात जीन्सऐवजी साडी पसंद केली जाते. फिरायला बाहेर जाताना ड्रेस चालतो. मात्र घरगुती समारंभात ड्रेसहि कमी मान्यता मिळवतो. साडीतील स्त्री ...ही प्रतिमा फारच लोकप्रिय झालीय. याबाबतीत आक्षेप घेण्याच थोडे बाजूला ठेवून काही गोष्टी निराळ्या पध्दतीने पाहूया. स्त्री ही मानव आहे हा विचार करून तिला तिच्या मनाप्रमाणे जगू दिले तर अधिक योग्य होणार नाही का ? तिने कसे वागावे , बोलावे याचे संकेत व नियम ठरवणारा समाज कोण असतो ? यावर पुरुषी झाक स्पष्ट असते की नाही ? याचाच अर्थ ..जे जे पुरुषसत्ताक व्यवास्थेला आवडते ते ते लोकप्रिय केले जाते. एक छाप तयार केला जातो. हा छाप सतत दक्षतेने उमटवला जातो आणि अधिक घट्ट केला जातो. हे एक प्रकारचे स्त्रीजातीवर समाजाचे नियंत्रण आहे. हे योग्य आहे का ? वास्तविक रुढ झालेल्या प्रतिमा , संकेत व नियम दर काही काळाने पुनःपुन्हा तपासायला हवेत. काळानूसार त्यात योग्य ते बदल हवेत. केवळ वर्षानुवर्षे चालत आलय म्हणून योग्य असले फसवे दावे करु नयेत. साडी अथवा जीन्स इथे केवळ प्रतिकात्मक आहेत . मुख्य आशय व मुद्दा होता तो " रुढ प्रतिमा , संकेत व नियम याविषयी पुर्नविचार " व्हायला हवा हा. तुमचे काय मत आहे ??

माणसांनो...जितक्या पध्दतीने व जितक्या नियमात बांधता येईल त्यानुसार आपण स्त्री " बांधत " जातो. तिच्या नैसर्गिक वागण्याला मोकळीक देत नाही . तिने कसे बोलावे , चालावे , वागावे हे इथली व्यवस्था ठरवाते. हे निश्चितच योग्य नाही . जो विवेकाच्या बाजूचा आहे , ज्याची दृष्टी साफ आहे आणि जो स्त्री वर्गाचा हक्क अधिकार मान्य करतो असा प्रत्येक जण माझ्या आशयाशी सहमत असेल यात शंका नाही . तरीही ...विचार कराच एकदा .

!! स्त्री वर्गाची रुढ प्रतिमा , ठरवलेले संकेत , आखून दिलेले नियम....यांच्यात कालोचित योग्य बदल अपेक्षित आहेत !!

 

Similar News