स्त्री स्वातंत्र्य आणि संविधान

Update: 2018-12-25 08:09 GMT

आजच्या काळातील भारतीय स्त्रियांचा विचार केल्यास आपणाला खुपच आशादायी चित्र दिसते. भारतातील सर्वोच्च पदे जसे की पंतप्रधान राष्ट्रपती इ, ही भुषवण्याची संधी भारतीय महिलांना मिळाली आहे. भारतीय महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे सर्व जे छान छान चित्र आहे हे भारतीय समाजातील खूप छोट्या वर्गाला मिळाले आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण नावे घ्यायला सुरुवात केली की ही यादी काही बोटावर मोजण्याएवढी नावे घेतली की संपते. हे कर्तृत्व गाजवणा-या क्षेत्रात घडते आहे. परंतु सर्व सामान्यतः २५ टक्के स्त्रिया तरी स्वावलंबी दिसत आहेत. हे सर्व जे काही आशादायक घटना भारतीय स्त्रीच्या वाट्याला येत आहेत. त्यासाठी भारतीय संविधानच कारणीभूत आहे हे लक्षात येईल. भारतीय संविधान हे डॉ. बाबासाहेबांनी संपादित केले, जे त्यावेळ्च्या घटना समितीने मान्य केले. भारतीय संविधान हे आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील मूल्यांची देणगी आहे हे विसरुन चालणार नाही. भारतीय संविधानातील समता स्वातंत्र्य आणि बंधुता चळवळीतून आली आहेत. यातील समता म्हणजे जात, धर्म , लिंग ह्या कोणत्याही आधारे भारतीय नागरिकांध्ये भेदभाव करता येणार नाही. भारतीय नागरीकांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळेल. तरही संधीची समानता जी संविधानाने दिली ती भारतीय समाजात होती का? तर निश्चित नव्हती. कारण आपल्या समाजाची धारणा ही मनुस्मृती नावाच्या ग्रंथाने झाली आहे . मनुस्मृती काही हजार वर्षापूर्वा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी कसे वागावे ह्या बाबतीतील कायद्याचे पुस्तक आहे. त्यात परस्पर विरोधी काही कायदे आहेत. आणि मुख्य म्हणजे चातुर्वण्याचा पुरस्कार आहे त्यात उतरंड आहे ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य हे तीन वर्ण द्विज तर क्षुद्र हा शेवटचा वर्ण.

ह्यामध्ये क्षुद्र,ढोर , पशु , नारी ह्यांना कुठल्याही प्रकारे संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही. महिलांना अबला समजले जाते ते ह्याच कारणामुळे. त्यांना संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही तसेच त्यांना स्वतंत्र पणे जगण्याचा अधिकार नाही. बालपणी पिता, तरुणपणी पती आणि म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे आणि महिलांनी पतिची सेवा करावी, संतातीचे पालन पोषण करावे, पतीच्या घरातील सर्व आबालवृद्ध आणि पाहुण्याची सेवा करावी. हे स्त्राचे कर्तव्य आहे. पुरुष जेव्हा लग्न करतो तेव्हा तो पूर्णत्वास पोचतो. कारण त्यानंतरच त्याला अपत्य होणे शक्य असून त्याला पुत्र होणे हे अतिशय आवश्यक आहे कारण सजातिय पत्नीपासून जन्माला आलेला पूत्र हा मागील पिढ्या, आताच्या पिढ्यांना मोक्ष प्राप्त करण्यास कारणीभूत आहे म्हणजे स्त्रीचे स्थान काय तर ‘क्षेत्र’ म्हणजे पुरुषाला संतती देण्याचे आणि तेही पुरुष संतती देण्याचे साधन.

आणि म्हणून मनुस्मृतीत म्हटले आहे की पित्याने मुलगी ऋकुमती व्हायच्या आधी तिचे लग्न करावे म्हणजे तिचा पुनरुत्पादनाचा काळ सुरु झाल्यानंतर एकही रुतु वाया जाऊ नये म्हणून मुलीचे लग्नाचे वय १२ वर्ष होते. आणि तिला कुठलेही धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक संस्काराची गरज प्रतिपादन केलेली नाही. आणि ऋतूमती झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत जर पित्याने मुलीचा विवाह नाही केला तर तिने स्वतः सजातिय मुलाशी लग्न करावे.पण तिला पिता किंवा भावाने दिलेले धन ठेवता येणार नाही. तिचा जन्मच पुरुषाला संतती देण्यासाठी असल्याने स्त्रीसाठीचे सर्व नियम मनुस्मृतीमध्ये त्या अनुषंगानेच निर्माण केले गेले आहेत.

स्त्रीचे कर्तव्य काय तर पतीला सर्व प्रकारचे सुख देणे. त्याच्या संतातीचे संगोपन करणे. पिता म्हणून आपल्या मुलीचा विवाह त्रतूमति झाल्यानंतर केला तर तो दोषास पात्र होतो आणि पुरुषाचे वय हे २८ वर्ष पूर्ण झाल्यानंतप फार तर २४ व्या वर्षी करावे. २८ वर्षे वयाचा पुरषने १२ वर्षे वयाच्या सुकुमार मुलीशी लग्न करावे. असाही उल्लेख आहे. स्त्रीला कुठलेही धन बाळगण्याचा अधिकार नाही मग तिचे धन काय तर स्त्रीधन जे तिला विवाहसमयी तिचे पिता आणि इतर नातेवाईकांनी दिले आहे तेवढेच. स्त्रीचा अधिकार घरातील भांडी कुंडीवरच आहे. तिचे जे काही धन आहे ते तिच्या पतिचेच असणार. आणि स्त्रीचे कर्तव्य जे आधी सांगितले आहे की पतिची आणि त्याच्या परिवाराची सेवा करणे आहे. पती जर व्यसनी असेल तरीही तिने त्याची सेवा करावी. त्याला सोडून जाऊ नये. स्त्री ने एक पतिव्रतच रहावे. आता हे विधान एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या एकाठिकाणी असेही म्हटले आहे की स्त्रीला जर पुत्र होत नसेल तर तिने घरातील वडिलधाऱ्यांच्या आज्ञेने दिरासोबत किंवा पतीच्या नातेसंबंधातील पुरुषासोबत समागम करावा. पुत्र होई पर्यंतच आणि पुत्र होण्यासाठीच. स्त्रीला जर मुलबाळ होत नसेल तर पुरुषाने दुसरा विवाह करावा.तिची मुल जन्मतःच मरत असतील तर ११वर्षे वाट पहावी व फक्त मुलीच होत असतील तशी ११/१२ वर्षे वाट पहावी व दुसरे लग्न करावे. पतीच्या पुनर्विवाहाने जर ती रागावून निघून गेली तर तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करुन तिला तिच्या पित्याच्या सुपुर्द करावे. धार्मिक विधी करतांना जर पत्नी रजस्वला असेल तर त्याने दुसऱ्या सजातिय पत्नी सोबत धार्मिक विधी करावा. स्त्रीने सजातीय पुरुषाशीच विवाह करावा किंवा उच्च वर्णीय पुरुषाशी करावा. कारण मुनुस्मृती प्रमाणे स्त्रीला समाजातील दर्जा हा तिच्या पतीच्या दर्जाप्रमाणे मिळतो.

आपल्या समाजाची संपूर्ण धारणाच मनुस्मृतिच्या पायावर झाली आहे व मनुस्मृती जर प्रमाण मानली तर स्त्रीचे आयुष्य हे पुरुषाला पुत्र देण्यासाठी आहे व स्त्री साठीचे नियम हे त्या अनुषंगानेच असल्याने मनुस्म-ती च्या नियामवलीमध्ये स्त्रीयांवर अन्याय झालेल् दिसून येतो आणि म्हणूनत आज ही समाजात मुलीच्या गर्भातच मृत्यू घडवून आणला जातो. आजही स्थळ बघतांना मुलीला जर भाऊ नसेल तर त्या मुलीचे लग्न होणे कठीणच होते. कारण मनुने म्हटले आहे की मुलीचा पुत्र हा आजोबांच्या अंश असल्याने त्यांचे क्रियाकर्म करु शकतो. कुठलाही पुरुष आपला मुलगा नाही तर मोक्ष नाही, तर कसे काय सासऱ्यांना आपला मुलगा देईल. भारतीय समाजाची जडणघडण समजून घेण्यासठी मनुस्मृती आवश्यक आहे पण स्त्रीयांना न्याय देण्याच्या दृष्टीने स्वाभिमानाने जगता यावे या दृष्टीने विचार करता आपण भारतीय संविधानाचेच जतन, रक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे.

Similar News