बीडच्या भररस्त्यावर ऑनर किलींग झाल्यानंतर विविध स्तरांतून दबक्या आवाजात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जाती संपल्या, अत्याचार संपले, उच्च-नीच भावना संपली, बहुजनांमध्येही असलेली जातीची उतरंड आता तितकी प्रभावी राहिली नाही, अशा हाकाळ्या देणाऱ्यांसाठी ही घटना अंजन ठरू शकेल. खास करून सध्याच्या राजकीय सामाजिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर बीडच्या या ऑनर किलींग ने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
शिक्षण आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीत हत्या करण्यात आलेला सुमित वाघमारे काही कमी नव्हता. सुमित इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तरीही कुटुंबाच्या इज्जतीच्या पोकळ अभिमान, जातीच्या पोकळ अस्मितेसाठी सुमीत चा खून करण्यात आला. सुमीतच्या पत्नीला ही या हल्लात दुखापत झाली. आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध आणि त्यातून त्या दोघांनी परस्परसंमतीने केलेले लग्न न पटल्याने बालाजी लांडगे याने सुमीतवर या आधीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी गेलेल्या सुमीतच्या पत्नीची तक्रार स्थानिक पोलीसांनी घ्यायला नकार दिला होता. इतकंच काय, पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आधीच बसले होते आणि त्यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असं ही सुमीतच्या पत्नीचं म्हणणं आहे. पोलीसांनी वेळीच लक्ष घातलं असतं तर कदाचित आज सुमीत जीवंत असता. सुमीत केवळ ऑनर किलींग चा नाही तर पोलीसी निगरगट्टपणाचाही बळी आहे.
विशेष म्हणजे ही घटना बीड मध्ये झालीय. बीड मध्ये महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचं सर्व चालतं असं म्हणतात. बीड पुरतं मी गृहमंत्री आहे, असं ही पंकजा मुंडे यांनी घोषित करून टाकलं होतं, त्यामुळे घटनेची जबाबदारी पंकजा मुंडे घेतील का? हाच खरा प्रश्न आहे.