लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज संसदेत गोंधळ करणाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत उपस्थित सदस्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाचव्या दिवशी विविध मुद्द्यांवर गदारोळ सुर होता. यावेळी महाजन यांनी ‘आपल्यापेक्षा शाळेतील मुलं बरी' अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला.
गदारोळामुळं लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा कामकाज सुरू झालं. भाजप, काँग्रेस, अण्णा द्रमुक, तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर गोंधळ केला. काही सदस्यांनी वेलमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्षा महाजनांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच 'विदेशातील शिष्टमंडळं आपल्याकडे येतात. तुमच्याकडे हे काय चाललंय, असा प्रश्न ते विचारतात. आमच्या शाळा खूप चांगल्या आहेत, असे मेसेज शाळकरी मुलं पाठवत आहेत. आपण शाळकरी मुलांपेक्षा वाईट आहोत काय?' असा सवाल त्यांनी लोकसभा सदस्यांना केला.