भारतीय संस्कृतीनुसार महिलांनी असं करु नये, तसं करु नये असे अनेक बंधन त्यांच्यावर लादले गेले आहेत. महिला ही लक्ष्मीचे रुप आहे असं ही काही जण म्हणतात. मात्र मला काही त्यांच म्हणणं काही पटत नाही बरका... आता बघा जर खरचं महिला लक्ष्मीचे रुप असतं तर तिला कुठल्याही मंदिरात सहज प्रवेश करता आला असता. मात्र आपल्या देशात महिलांना काही मंदिरात प्रवेश नाकारला आहे. कारण त्यांना मासिक पाळी येते म्हणून...
आता तुम्हीच विचार करा जर महिलांना मासिक पाळी आली नसती तर या तुमच्या-आमच्या सारखे कसे काय जन्माला आले असते. हा साधा प्रश्न या देवभक्त मानसिकतेला पडत नाही का?
महिलांच्या त्याच मासिक पाळीतून तुमचा आमचा जन्म झालेला आहे मग ती अपवित्र कशी काय.. ती जर नसती तर तुम्ही नसता , आणि हो तुम्हाला बरं मंदिरातला तो देव सांगतो की माझ्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. याचा अर्थ देव तुमच्याशी बोलतो तर मग तुमच्या देवाला हे सांगा की या जगात फक्त पुरुषच राहु दे महिलांची गरजच नाही. असं जर होत असेल तर बघा तुमच्या देवाला सांगून… आणि दुसरी गोष्ट जे लोक महिला मंदिर प्रवेशाला विरोध करतायत त्यांच्या कुटुंबियात एकही महिला नाही का? त्या अपवित्र महिलांसोबत तुम्ही कसे काय राहता?
असो... हे झाले धार्मिक मुद्दे परंतु आपण ज्या देशात राहतो त्या देशात स्त्री-पुरुष समानता आहे. संविधानाने तो अधिकार सर्वांना दिलाय मात्र काही लोक स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय कधीच दिला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी उशिराने झाली.. पहाटे सकाळी दोन महिलांनी धाडस दाखवत मंदिर प्रवेश केला मात्र त्यालाही विरोध झाला. आता सध्या शबरीमाला येथील वातावरण चांगलचं तापलं आहे. कोर्टोने दिलेल्या निर्णयाचे पालन करायचे नाही अशी मानसिकता असलेल्या लोकांना या देशातच राहण्याचा अधिकार नाही. शबरीमालाच्या या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर न्यायालया पेक्षा देव मोठा वाटू लागलाय. कारण पुजाऱ्यांनी या निर्णयाचा अवमान करत महिलांना प्रवेशबंदी नाकारली. दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण सुरु करण्यात आले. यातून एकच बोध निघतो तो म्हणजे कोर्टाने काहीही निर्णय दिल्यानतंर आपलीच मनमानी चालवायची... कोर्टापेक्षा दगडाचा तो देव मोठा...