माझ्या कॅन्सर डिटेक्शनला आज एक वर्ष झालं. आपल्याला कॅन्सर झालाय या विचारातून मी अजूनही संपूर्णपणे बाहेर आलेले नाही. तो विचार सतत मनाच्या एका कोप-यात असतोच. पण तो विचार कायमच मनात राहाणार आहे हे मला माहीत आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये आजच्याच दिवशी आम्ही ऑन्कोसर्जनकडे गेलो आणि निदानावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतरचे ५ महिने म्हणजे एक वेगळीच मी तयार होण्याचे होते. निदान करण्यासाठीच्या चाचण्या, ते कळल्यावरचा मानसिक गोंधळ आणि भांबावलेपण, ब्रेस्ट सर्जरी, त्यानंतरचा महिना काखेत जमणारं पाणी (सेरोमा) काढण्यासाठीच्या हॉस्पिटलच्या चकरा, ते झाल्यावर रेडिएशनसाठीचं प्लॅनिंग स्कॅन, त्यासाठीचे टॅटू करणं, नंतरचे चार आठवडे सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी हिंदुजाला रेडिएशनसाठी जाणं, ते संपल्यावर टाटाचा फॉलोअप, नंतर मार्चमध्ये संपूर्ण हिस्टरेक्टोमी (माझा कॅन्सर हार्मोन रिसेप्टर आहे. ओव्हरीज हार्मोन तयार करतात म्हणून सगळंच काढलं. काढलं नसतं तर मग केमोथेरपी घ्यायला लागली असती), त्यानंतरची सहा आठवड्यांची सक्तीची विश्रांती. हुश्श!
हे सगळं एकीकडे सुरू होतं आणि दुसरीकडे मी आपल्या दिनक्रमात काहीही बदल होऊ द्यायचा नाही यासाठी प्रयत्न करत होते. ब्रेस्ट सर्जरीनंतर आठव्या दिवशी नेहमीसारखा वॉक घ्यायला लागले. एकीकडे संक्रांतीसाठीच्या काळ्या साड्यांचं काम सुरू होतं. त्या डिझाइन करणं, त्यांचं कटिंग, आल्यावर त्यांचं टॅगिंग सुरू होतं. सर्जरीनंतर दोन आठवड्यात आम्ही या साड्यांचं फोटो शूट केलं. माझी जखम ताजी होती म्हणून घरातच शूट केलं. चिन्मयी, सुहिता आणि मी अशा तिघींचे फोटो दीयानं काढले. संक्रांतीच्या साड्या फक्त ऑनलाइनच असणार होत्या. त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता.
रेडिएशनच्या प्लॅनिंगसाठी हिंदुजाला गेले आणि त्या प्रोसिजरला आजुबाजूला डॉक्टर आणि त्यांच्या सहायकांनी गर्दी केल्यावर आता आपण शांत राहून यांना संपूर्ण शरण जायचं हे मनोमन ठरवून टाकलं. डोळे मिटून घेतले आणि ती प्रोसिजर पार पडली. त्यानंतर आठवड्यानं रोज रेडिएशनला जायला लागले. हिंदुजाची सिस्टिम खूपच चांगली आहे त्यामुळे त्यात कसल्याही अडचणी आल्या नाहीत. रोज साधारण ४५ मिनिटं ते एका तासात मी घरी येत असे.
त्यानंतर टाटाला परत फॉलोअपला गेले. डॉक्टर बडव्यांना हिस्टरेक्टोमी महिन्यात केली तर चालेल का विचारलं तेव्हा ते म्हणाले करून टाका. चिन्मयीची परिचित म्हणून प्रज्ञाकडे गेले. पहिल्याच भेटीत हिच्याकडूनच सर्जरी करून घ्यायची हे नक्की केलं इतकी मला ती आवडली. खार हिंदुजाला ६ मार्चला ती सर्जरी पार पडली. दोन दिवसांनी घरी आले. ठरलेली सक्तीची विश्रांती घेतली.
विश्रांती संपल्यावर पहिला प्रवास केला तो औरंगाबादला. आठवडाभर राहून आल्यावर मात्र आता खूप झालं असं वाटलं आणि कामाला लागले. मेमध्ये माझं पहिलं प्रदर्शन झालं ते पुण्यातल्या स्टुडिओ आद्यामध्ये. सायलीनं सांगितलं की तू फक्त लोकांशी बोल आणि जास्तीत जास्त खुर्चीवर बसून राहा, बाकीचं सगळं काम आम्ही करतो. ती म्हणाली तसंच त्या सगळ्यांनी केलं. प्रदर्शन उत्तमरित्या पार पडलं.
जूनमध्ये मी आणि सायली लंडनला गेलो. हा प्रवास तसा अचानकच ठरला. मी जायचं ठरवलं कारण मला स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवायचा होता आणि शारीरिक शक्ती अजमावून बघायची होती. लंडनमध्ये रोज ८-१० किलोमीटर चालू शकले. असं एकदाही वाटलं नाही की मला हे जमणार नाही. कुठल्याही मोठ्या धक्क्यातून बाहेर येताना असा विश्वास मिळणं गरजेचं असतं.
त्यानंतर ऑगस्टमध्ये दोन आणि ऑक्टोबरमध्ये चार प्रदर्शनं केली. त्यासाठी जुलै ते ऑक्टोबर भरपूर काम केलं, शारीरिक आणि बौद्धिकही. पण कंटाळा आला नाही किंवा आता करायला नको असं वाटलं नाही.
बडव्यांनी एकच पथ्य सांगितलंय आणि ते म्हणजे अजिबात वजन वाढू द्यायचं नाही. गेल्या वर्षभरात मी सहा किलो वजन कमी केलंय. खप्पड दिसलं तरी चालेल पण वजन वाढता कामा नये हे मनोमन ठरवून टाकलंय. त्यामुळे सकाळी उठलं की पाणी पिऊन मी ४५ मिनिटं चालून येते. दिवसातून शक्यतो फक्त दोनदा जेवते. रात्री जेवल्यावर किमान १५ तासांचा उपास करते. आता गोड पदार्थही बंद केलेत. फक्त सणाच्या दिवशी किंवा विशेषप्रसंगी खायचे असं ठरवलंय. व्यवस्थित विचार करून जेवते.
मी जे इस्ट्रोजन ब्लॉकर घेतेय (जे मला पाच वर्ष घ्यायचं आहे) त्यानं प्रचंड अंग दुखतं, सकाळी उठल्यावर पटकन चालू नये असं वाटतं, कधीकधी बसल्याबसल्या झोप येते, थकवा येतो, केस खूप गळतात. पण हे या गोळ्या घेणा-या सगळ्याच बायकांना होतं हे मला माहीत आहे.
माझ्यात गेल्या वर्षभरात काय बदल झाले?
मला आयुष्याकडे कृतज्ञतेनं बघता यायला लागलं. लोकांचे प्रॉब्लेम बघितल्यावर आपल्याला काहीच नाहीत याची जाणीव झाली. आपल्याला आर्थिक प्रश्न नाहीत, आपलं कुटुंब आपल्याबरोबर आहे, आपली मित्रमंडळी आपल्यासाठी कधीही धावून येतात याचं महत्त्व जाणवलं. माझा संताप पूर्णपणे गेला, मला थोडा राग कधीतरी येतो पण पूर्वीसारखा संताप येत नाही. राग आला तर राग करणं वर्थ आहे का असं वाटतं आणि राग ताबडतोब शांत होतो.
ज्यांच्यासाठी खूप जीव टाकला, ज्यांना खूप जीव लावला अशा आपल्याशी वाईट वागलेल्या लोकांना माफ करायला शिकले. आपल्याशी ते असे का वागले किंवा वागतात असा प्रश्न हल्ली फार तर फार मिनिटभर मनात येतो आणि नंतर तो विरून जातो. त्यांचा राग येत नाही. कारण आपल्याला जीव लावणारी त्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं आहेत याची जाणीव आणखी लख्ख झाली आहे.
ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात – एखादा सिनेमा, नाटक बघायचं असेल, प्रवास करायचा असेल, एखादं पुस्तक वाटायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला भेटायचं असेल तर ते शक्य तितक्या लवकर करावं हे मला समजलं आहे. नाहीतर कितीतरी गोष्टी राहून जातात.
मी पूर्वीपेक्षा दुपटीनं काम करायला लागलेय. मग ते साड्यांचं असो, अक्सेसरीजचं असो किंवा इतर कुठलंही असो. माझा रोजचा दिवस आता मस्त कामात जातो. माझं काम मी आनंदानं करते. मला वाटतं मी त्यामुळेच आजाराचा फारसा विचार करत नाही.
जवळच्या माणसांबद्दल आपल्याला वाटणारा जिव्हाळा व्यक्त करणं किती महत्त्वाचं आहे हे मला उमगलं आहे. माझा भिडस्तपणा कमी झालाय. एखादी गोष्ट जमत नसेल तर मला पूर्वी तसं स्पष्टपणे सांगायला जमायचं नाही. मी ते प्रयत्नपूर्वक जमवलंय. आणि असं सांगण्यात काही चूक नाही हेही मला कळलंय.
कुटंब तर आपलंच असतं, कुटुंबियांना आपल्यावर प्रेम करण्यावाचून पर्याय नसतो. पण मित्रमैत्रिणीही किती महत्त्वाचे असतात याची मला वारंवार जाणीव होते. त्यांना शक्य तितक्यादा भेटायचं, गप्पा मारायच्या हे मी नेहमीच करत असे, पण आता तर मी अशी एकही संधी सोडत नाही.
हे आज मी लिहिलंय याचं कारण आज सकाळपासून हे सगळे विचार मनात येत होते. #हॉस्पिटलडायरी मध्ये मी सगळं विस्तारानं लिहिलं आहेच. आपल्याला सहजपणे किती गोष्टी मिळाल्या आहेत, आपल्याला इतरांच्या तुलनेत फारशा विवंचना नाहीत याची जाणीव मला होतीच पण ती आता अधिक प्रकर्षानं झाली आहे. आयुष्याबद्दल आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांबद्दल अधूनमधून कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी, नाही का?