आजच्या चिमणा चिमणीची गोष्ट...

Update: 2019-01-01 13:02 GMT

चिमणीचे सगळे काम आटोपले, तीच्या करीअर मधे ती सेटल झाली,चिमणा ही आता स्थिरस्थावर झाला होता आणि चिमणीच्या पिल्लाच्या पंखात आता बळ आल्याने तो कधीच घरट्याबाहेर उडुन गेला होता,

तरीही चिमणीला कुठेतरी एक सल टोचत होती, काही तरी कमी असल्याची अपुर्णत्वाची जाणीव तीला होत होती,कुणाशी तरी बोलावं, मन मोकळ कराव अस प्रकर्शाने जाणवत होतं..चिमणीची घुसमट होत होती, जर माझ्या घरट्यात मी सुखी आहे, तर हा सल कसला? हे काही केल्या चिमणीच्या लक्षातच येत नव्हते..तशी तर दिवसरात्र आपल्या करीअर च्या मागे लागलेली चिमणी जरा निवांत बसली की तिला कुणाबरोबर तरी मन मोकळ करण्याची जबरदस्त उर्मी दाटुन येत होती, व्यवसायाच्या निमीत्ताने निर्माण झालेली नाती, बिल्डींग मधल्या मैत्रीणी कोणी कोणी तीला जवळचे वाटेना..अगदी चिमणा सुध्दा तीला परका वाटायला लागला..

आपल्याला नक्की काय हवय हेच चीमणीला कळेना आणि अचानक एका संध्याकाळी तीला कावळ्याची आठवण झाली.. आणि तिच्या लक्षात आलं की, अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं.

आता दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. आता चिमणीला अगदीच करमेना, कावळ्याची विलक्षण आठवण येउ लागली

कावळ्याने कित्येक वर्ष केलेल्या दारावरच्या टकटकीचा आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...

अनेक दिवस उलटले ....

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.

एका उदास संध्याकाळी हीच अपराधीपणाची जाणीन मनात ठेउन चिमणी आपल्या कामात गढली होती...काही बोलायचे आहे, सांगायचे आहे पण कोणाला? अशाच विचारात असलेल्या चिमणीचा मोबाईल वाजला.. अनोळखी नंबर पण ओळखीचा आवाज... हाच तो क्षण ज्याची चिमणी गेल्या कित्येक महिन्यांपासुन पाट पहात होती..चिमणीच्या तोंडातुन शब्दच फुटेना..आनंद की आश्चर्य की अपराधीपण? ...नेमकी काय भावना व्यक्त करावी हेच तीला कळेना..तीला काही बोलताच येईना...मग पुन्हा एकदा कावळ्यानीच सावरुन घेतलं... कावळ्याच्या नुसत्या मोबाईलच्या दुसर्या बाजुला असण्यानेच चिमणीचा सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला.

अग आता तरी वेळ आहे की नाही माझ्याशी बोलायला?...कावळ्याच्या नुसत्या ह्या वाक्यांनीच चीमणीला बालपणी हरवलेले ते वहीतले पिंपळाचे पान गवसल्याचा आनंद झाला..चिमणीचा बंाध फुटला.. घडाघडा मन मोकळ करणारी चिमणी आपल्याला किती मीस करत होती ते कावळ्याला जाणवल आणि आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने रहाणार्या कावळ्याला चिमणीला या क्षणी आपली अत्यंत गरज असल्याचे ही जाणवल...चिमणी ला मात्र काय बोलु आणि काय नको असच झाल होतं..ती निराशा, तो एकटेपणा आणि अपराधीपणा कुठल्याकुठे वाहुन गेला होता..

कावळ्याचं ते शांतपणे ऐकुन घेणे पाहुन चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा?

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

चिमणी ही आता सावरली होती.. मी खुप खुश आहे रे माझ्या घरट्यात.. मनासारखा नवरा आणि माझ्या पध्दतीने मी माझ करीअर घडवल..माझ पिल्लु ही आता मोठ झालय..मी खुप आनंदी आहे पण तुला नाही विसरु शकले..पण मला राधा व्हायचं होत.. कृष्णाला समजुन घेणारी राधा..त्याच्या पायात काटा टोचला तर डोळ्यात पाणी येणारी राधा..मला मैत्रीण व्हायचं होत, सखी व्हायच होत.. का तुम्हा पुरुषांना प्रत्येक नात्याला लेबल लावायचीच घाई झालेली असते...का जरा एखादीबरोबर मन जुळलं की तुम्हाला ती राधेच्या नव्हे तर रुक्मीणीच्याच रुपात हवी असते...सखी, मैत्रीण हे नात नसतच का रे आणि मी जरा हक्काने माझ्या कृष्णाला साद घातली तर रुक्मिणीच्या डोळ्यांत मी काटा बनून लगेच सलणार

मला तुझी रुक्मीणी व्हायचे ही नव्हते आणि तुला मी राधेच्या रुपातही नको होते..एक तर तुम्हाला तुमची भक्ती करणारी मीरा हवी असते नाहीतर मग रुक्मिणी...राधेचे स्थान कधी नसतच का रे तुमच्या जिवनात

माझ्या या मनाच्या आंदोलंनादरम्यान जर तु माझे दार वाजवलेस तर कुठल्या नात्यांनी मी दरवाजा उघडु?...

-आज मी आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये' पण तुझी मैत्री आणि माझ्या आयुष्यातलं तुझ स्थान मला नेहमीच जाणवतं..आज मला कुणाजवळ तर मन मोकळ करायचं होतं, मला कुणाच्या तरी खांद्यावर विश्वासाने मान टेकवायची होती..आणि मला पुर्ण माहीती होत की तो तुच आहेच...प्रत्येक स्त्रीच्या मनात एक कृष्ण असतो, ती कुणाची तरी राधा असते...फक्त हे नात समजुन घ्यायची गरज असते..काचेच्या वस्तुंवर ‘हॅडल वीथ केअर’ लिहीलेल असत ना तर ते नात खुप नाजुकपणे सांभाळण्याची गरज असते..ह्या नात्यात लक्ष्मणरेषा ही ओलांडायची नसते आणि समोरच्या ला दुखवुन नात्याला तडा ही जाउ द्यायचा नसतो..

चिमणी पुन्हा नि:शब्द झाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडीन… क्षणाचाही विलंब न करता.

Similar News