"अमित शहा यांना अडकविण्यात सोनिया गांधी यांचा हात होता "- स्मृती इराणी

Update: 2019-01-02 11:05 GMT

सोहराबुद्दीन, त्यांची पत्नी कौसरबी आणि त्यांचा सहाय्यक तुलसीदास प्रजापती यांच्या कथित हत्या प्रकरणाच्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली.

याबाबत केंद्रीय वस्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी, "सीबीआयची मदत घेऊन सोनिया गांधी यांनी कट रचला," असा थेट आरोप काँग्रेसवर केला आहे. त्या म्हणाल्या की, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे काँगेसचे मनसुबे धुळीला मिळाले. सोहराबुद्दीन प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शहा यांना अडकविण्यात काँगेस नेत्या सोनिया गांधी यांचा हात होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक कट करत अमित शाह यांना सीबीआयच्या मदतीने सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवले. आठ वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते. त्यादरम्यान अमित शहा यांना प्रचंड त्रास झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास झाला. तरीही त्यांनी हे सगळे सहन केले. त्यांच्यासोबत आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनीही सगळे सहन केले. अमित शहा यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासाठी हा डाव काँग्रेसने आखला होता. असे वक्तव्य करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Similar News