आज ती दिसली..तब्बल १८ वर्षांनी,उणे अधीक एक दोन वर्ष असतील पण तीच ती पुर्वीपेक्षा अधीक थकलेली..चेहर्यावर वयोमानाच्या खुणा..बाकी काहीच बदल नव्हते..आज ही नाव माहित नाही तीच!...आणि जाणुन घ्यायची गरज ही नाही वाटली..पण तीच बोरीवली चर्चगेट शेवटची लोकल,तोच सेकंड क्लास चा डबा आणि पेंगुळलेली ती...बदलले होते मी?मध्यरात्री कधीतरी मी लोकल सुटु नये म्हणुन सेकंड क्लास च्या त्या डब्यात धावत पळत चढले..ती बसली होती तशीच झोपायच्या तयारीत..गिर्हाईकांचे चोचले पुरवून आलेली..
जिंदगींके सफर मे गुजर जाते है दो मकाम..वो फिर नही आते!फिर नही आते...राजेश खन्ना च्या चित्रपटातल ते गाण एकदम आठवलं आणि एक एक स्टेशन मागे जात १८ वर्षापुर्वी च्या १२.१६स्लो लोकल जवळ येउन थांबली..
पत्रकारीतेच्या क्षेत्रात नवीनच आलेली मी!काही तरी वेगळ करायच्या या वेडानी झपाटलेली!त्यातच मला थ्रिलींग वाटणार्या,ईनोवेटीव वाटणारी ती स्टोरी आयडीया घेउन आनंद अवधानी सरांसमोर उभी राहीलें..
चर्चगेट वरुन सुटणार्या शेवटच्या लोकल मधल्या महिलांची संवाद!तोकडा फ्राॅक आणि कुठलींशी चीप लिपस्टीक लावली,आणि ह्या डान्सबार मधे काम करणार्या बारगर्ल पैकी एक झाले..
सगळ्यांच्याच वेगवेगळ्या रहाण्यास,पण दुखाची जातकुळी एकच...एकमेकीला हाक मारतानाही अवयवांचा उध्दार ठरलेला..।
कोपर्यात ती दिसली,जवळच्या बाटलीतले द्रव्य किती जमलेय ते पहाणारी!झाकण गच्च लागलंय ना हे तपासुन पहाणारी
ते द्रव्य ती कुठुन आणि कशासाठी आणत होती हे समजुन घेण्यासाठी मला दोन 12.16 च्या लोकल जाउ द्याव्या लागल्या.. प्रवास तिची सहप्रवासी म्हणुनच करत होते पण ती भिंत आडवी येत होती..तिच्या आणि माझ्यातली ती दरी सांधण्याचा प्रयत्न करत अखेर मी तीला विचारल..
‘दिदी कुछ काम होना..गाव से आई मै!’
‘दिदी अब कुछभी होना...खानेकुच नही घरमे, मरद शादी किया रे मेरा दुसरी’(मनातल्या मनात घरी गॅलरीत माझ्या काऴजीनी हैराण झालेल्या माझ्या नवर्याची मी क्षमा मागते)
‘तो?..बारमे काम करेगी?..कुलाबा मे है’..
‘हा दिदी करेगी ना!’
‘अच्छा रुक! मै दल्ले को बुलाती मेरे..वोच बताएगा..पनवेल साईड जाएगी क्या?’
‘हा ना दिदी’..
‘अच्छा तेरा मरद कायकु छोडा रे तेरेकु’?..समस्त पुरुष जातीला माझ्या सात पिढ्यांनी न ऐकलेली अर्वाच्च शिवी हासडुन तिनी विचारल..
तो पर्यत मी बर्या पैकी तीच्याच जगात गेले होते..मी ही मला येणारी गावठी शिवी देत माझ्या मरद ला दुसरी बाई आवडल्याच सांगीतल तीच्याच भाषेत!..
माझी ती उत्सुकता शांत बसु देत नव्हती..’वो बाटली मे क्या भरके लेके जाती रे तु?’
‘दारु है रै वो!..गिराईक पिता है ना तो गिलास मे बचती है ना वो मै बाटली मे भरती’..
‘काय कु’? मी विचारले..
परत समस्त पुरुष जातीला एक सणसणीत शिवी आणि त्य्या नंतरच उत्तर मात्र सुन्न करणार होत..
‘मेरे मरद के वास्ते रे..पिनेकु लगती ना उसकु’
‘अभी घर जानेके बाद उसकु पता है ना मै दारु लाएगी, तो वो झोपडे मे आएगा ना’..
‘तब तक किदर होता वौ?
‘अरे किदर क्या? मरद जात है ना?..किदर किदर मुह मारता फिरता!’..
अरे देवा!!!!!!!!...माझी पितर आठवली मला..
जो मरद तीचा नाहीच त्याच्यासाठी म्हणुन ही गिर्हाईकांच्या ग्लासाच्या तळाशी राहीलेली दारु आठवणींनी जपुन नेत होती..आणि तीचा मरद.....
आम्ही बायका जगतोच केवळ या साठी! ....तिच्या भाषेत हजार ठिकाणी शेण खाल्लेल्या नवर्यांनी सगळे उद्योग उरकल्यावर तरी घरी याव म्हणुन...
आठवडाभर या शेवटच्या चर्चगेट बोरीवली लोकलनी प्रवास केला मी कुठल्याच शब्द कोषात सापडणार नाहीत असे शब्द आणि जगातल्या कुठल्याच एनसायक्लोपीडीयात मिळणार नाही असा खजीनाच मिळाला मला..मात्र त्याचा दल्ला मला नवी मुंबईला घेउन जायला आला तेव्हा मात्र ती लोकल सोडली मी...नव्या मुंबईतुन कुठेकुठे गाड्या भरुन जातात, कसा व्यवहार ठरतो हे पण याच डब्यात कळल..एक मात्र कळल, यांच्यातली कुठलीच महिला स्वताच्या चैनीसाठी हे करत नव्हती, ती त्यांच्यी गरज होती..कुणाला घरी पैसे पाठवायचे होते, तर कुणाला पोराला शिकवायच होत..
आणि मधला णि पहीला की दुसरा या वरुन तब्बल 20 वेळा अवधानी सरांनी माझी कॉपी फेकुन दिली होती..आज देखील आणि लिहीताना मला सर आठवतात..18 वर्षापुर्वी मात्र जी माझ्याशी कनेक्ट झाली होती पण तीचा हात हातात घ्यायच धाडस माझ्यात तेव्हाही नव्हते आणि आजही नाही..तीनी कदाचीत मला ओऴखल असेल पण माझ्याजवऴ येउन कैसी है रे तु विचारण्याचे धाडस तिच्या मधेही नव्हत...थकलेला तो चेहरा आजही जोगेश्वरीलाच उतरुन गेला..वयोमानानी थकलेला तर होताच..आता डान्सबार मधे जाता येत नसेल तर दारु कुठुन मिळवतेस हा माझा प्रश्न मात्र मला फस्ट क्लासचे पांढरपेशे पण विचारु देत नव्हते..
ती उतरल्यावर मी डब्याच्या दारात आले..ती ठिपका होईपर्यत पहाणार होते तीला ! ती कुठे गायब झाली ते कळल नाही... पण मी तीला अठरा वर्षा नंतर ही विसरलेली नाही हे मात्र मला नक्की कळल..