सध्या अनेक राजकीय घराणातील महिला राजकारणात हळूहळू सक्रीय होताना पाहायला मिळतायत…सध्या महाराष्ट्रातील पॉवरफुल राजकीय घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे परिवारातील रश्मी ठाकरे यांचं ही राजकारणात सक्रीय होणं चर्चेचा विषय बनलाय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आता आवर्जून दिसतात. अयोध्या असेल नाहीतर पंढरपूर, रश्मी ठाकरे सर्वच राजकीय कार्यक्रमांना हजर राहताना दिसतायत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती आली आणि यात विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरेंना प्रत्येक पावलांवर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी पाठिंबा दिला. तसेच अनेक सभा, कार्यक्रम,निर्णयात प्रकर्षाने त्यांचा पुढाकार असतो. अनेक सभेत, कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लक्षणीय असते.
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या पत्नींनी पडद्याआडून सूत्र सांभाळल्याचं चित्र फारसं पाहायला मिळत नाही, याआधी उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरेंचा रिमोट चालतो किंवा त्याच पडद्याआडून सूत्र हलवतात अशी चर्चा होती. परंतू रश्मी ठाकरेंनी कधी जाहीररित्या आपली राजकीय इच्छा कधी बोलून दाखवली नाही. त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत असतात, कार्यकर्त्यांना भेटतात, महिला पदाधिकाऱ्यांची आस्थेने चौकशी करतात, मात्र राजकीय निर्णयात सक्रीय सहभाग नोंदवत नाहीत. येत्या लोकसभा निवडणूकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी आक्रामकपणे नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय. 2014 ला भाजपासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदरात अपमानाशिवाय फारसं काही पडलं नाही, अशा वेळी 2019 च्या निवडणूकीत याला फटका पक्षाला बसू नये म्हणून उद्धव ठाकरे राज्याच्या विविध भागांत दौरे करताना दिसत आहेत. अशा वेळी उद्धव एकटे पडू नयेत या साठी रश्मी ठाकरे त्यांच्या सतत सोबत असतात असं सांगण्यात येतं. शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मते रश्मी ठाकरे चांगल्या रणनितीकार ही आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत असण्याचा पक्षाला ही फायदा होत आहे.