सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या एका वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्याबाबत आता राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आ. साळुंखेंना इशार दिला आहे.
सक्षणा यांनी पुण्यात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, "जर आ.साळुंखे या प्रकरणात दोषी असतील तर आम्ही कोल्हापुरी चपलेने त्यांना मारू. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही. महिलांचा अवमान करणारे राम कदम असो दीपक आबा असो किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जरी महिलांचा अनादर केला तर सर्वाना एकच न्याय दिला जाईल. आमदार राम कदम मला राज्यात कुठेही भेटू दे त्याचं तोंड आम्ही कोल्हापुरी चपलेने फोडू, माझी कोल्हापुरी चप्पल राम कदमची वाट पाहत आहे. व्हायरल झालेली क्लिप ही जर दीपक साळुंखे यांची नाही याचा मला विश्वास आहे. साळुंखे आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेलं आहे. मात्र जर या प्रकरणात साळुंखे यांच्यावरील आरोप सिध्द झाले तर त्यांना देखील कोल्हापुरी चपलेने मारू."