आज १६ डिसेंबर… सहावर्षांपूर्वी आजच्या दिवशी दिल्लीत निर्भया गँगरेप झाला या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला. निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर त्या सहा नराधमांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. हे झालं दिल्लीतील निर्भया हत्याकांडविषयी परंतु देशभरात दररोज १०० हून अधिक बलात्काराच्या घटना होतात. मात्र यातील क्वचित म्हणजे मोठ्या शहरांतील आणि निवडक घटनाच प्रसारमाध्यांतून आपल्यापर्यंत पोचतात. माध्यमांकडून ही निवड कोणत्या निकषांवर केली जाते याचा विचार आपण कधी करतो?
अशा बातम्या आकर्षक आणि चमचमीत करण्याकडे प्रसारमाध्यमांचा जास्त कल असतो. मात्र यातून त्या घडलेल्या घटनेची किंवा त्या पीडित महिलेची गोपनियता बाळगली जात नाही… बातमी विकण्याच्या जोशात ही प्रसारमाध्यमं सामाजिक भान आणि कायदाचा धाकही विसरुन जातात. खरंतर आपल्याकडील प्रसारमाध्यमं ही हिंसा करण्यापेक्षा ज्याच्यावर हिंसा झाली आहे तिची माहिती देण्यात व्यस्त असतात. मग बलात्कार पीडित मुलीचे वय, राहणीमान, ती कुठे काम करते, कशासाठी घराबाहेर पडली होती, कोणते कपडे घातले होते, ती विवाहित आहे की तिला एखादा बॉयफ्रेंड आहे, याविषयीच्या उल्लेखातून एक प्रकारे तिच्यावर झालेल्या हिंसेला तीच जबाबदार असल्याचे सुचवले जाते. काही वेळा अतिउत्साहाच्या भरात माध्यमांकडून तिच्याविषयीचे इतके तपशील सांगितले जातात की तिची ओळख सहज उघड होऊन जाते. खरंतर हा भारतीय दंड विधानाच्या कलम 228-A नुसार बलात्कारी पीडित व्यक्तीची ओळख देणं हा गुन्हा आहे.
आज निर्भया हत्याकांडला जरी सहा वर्षे पूर्ण झाली असली तरीही समाजातील परिस्थिती जैसे थे आहे. महिलांकडे भोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्यांना अजूनही चाप बसला नाही शिवाय अत्याचारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्यास जर त्या अत्याचाराविरोधात जनसमुदाय रस्त्यावर उतरला तर तिला न्याय मिळतो परंतु सामान्य पीडित महिलांचं काय त्यांना कधी न्याय मिळणार…
महिलेवरील लैंगिक अत्याचार झाल्याची घटना कळताच त्याचे कव्हरेज, रिपोर्टिंग किंवा बातमी कशी करावी यासाठी स्पेशल प्रशिक्षण द्यावे लागणार की काय असा प्रश्न आजच्या प्रसारमाध्यमांना पाहून पडतो. फक्त ब्रेकिंग न्यूज चालवून ती सोडून द्यायची असा खेळ सध्या मीडियात सुरु आहे. परंतु ती बातमी लावल्यानंतर त्याचे पुढे काय होते… हे प्रकरण निकाली लागलय की नाही याची साधी विचारणाही आमच्या प्रसारमाध्यमांना जमत नाही बहुतेक…
महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा तर दोषी आहेच परंतु प्रसारमाध्यमं ज्या पद्धतीने ज्या शब्दांचा वापर करत अशा बातम्या प्रसारित करतायत याला काय म्हणावं कायद्याच्या चौकटीचे भान ही माध्यमं विसरताना दिसतायत.