मिताली राजकडे वन-डेचे तर हरमनप्रीत कौरकडे टी-२०चे नेतृत्व
जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली असून, यात वन-डे संघाचे नेतृत्व मिताली राजकडे, तर टी-२० संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे कायम ठेवण्यात आले आहे.
भारतीय महिला संघ या दौऱ्यात तीन वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतरचा भारतीय महिला संघाचा हा पहिलाच दौरा आहे. नुकतीच भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वुर्केरी रमण यांची निवड झाली. त्यानंतर लगेचच पंधरा सदस्यीय महिला संघाची निवड करण्यात आली.
शुक्रवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीला मिताली राज उपस्थित होती. हरमनप्रीत कौर बिग बॅश स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात खेळत आहे. ती स्काइपद्वारे या बैठकीला सहभागी झाली होती. निवड समितीच्या अध्यक्षा हेमलता काला यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय महिला संघाची घोषणा केली.
हे स्पर्धक खेळणार वन-डे स्पर्धा
वन-डे संघ : मिताली राज (कॅप्टन), पूनम राऊत, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिगेज, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तानया भाटिया, मोना मेश्राम, एकता बिस्त, मानसी जोशी, डी. हेमलता, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, शिखा पांडे.
हे स्पर्धक खेळणार टी-२० स्पर्धा
टी-२० संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, मिताली राज, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिगेज, अनुजा पाटील, डी. हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, तानया भाटिया, पूनम यादव, एकता बिस्त, राधा यादव, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया.
लढतीचे वेळापत्रक :
पहिली वन-डे - २४ जानेवारी - नेपियार; दुसरी वन-डे - २९ जानेवारी - बाय ओव्हल; तिसरी वन-डे - १ फेब्रुवारी - हॅमिल्टन. पहिली टी-२० - ६ फेब्रुवारी - वेलिंग्टन; दुसरी टी-२० ८ फेब्रुवारी - एडन पार्क, ऑकलंड; तिसरी टी-२० - १० फेब्रुवारी - हॅमिल्टन.