एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर कायमचे नियंत्रण मिळवणे शक्य असते का ? काही लोकं हो म्हणतील काही नाही म्हणतील. हे नियंत्रण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून होते तेव्हा ते वेगळे रुप धारण करते आणि जेव्हा ते नियंत्रण ती व्यक्ती एखाद्या धर्मग्रंथाचा आधार घेऊन करते तेव्हा त्याचे स्वरुप व परिणाम फारच भीषण असतात. हे धर्मग्रंथ मानवी जीवनावर बरेच अधिराज्य गाजवत असतात. या धर्मग्रंथावर मोठ्या लोकसंख्येचा विश्वास असतो. याकारणे यामध्ये व्यक्त झालेली मते रोजच्या व्यवहारात अगदी सहजपणे लागू झालेली दिसताता. स्त्री जीवनावर या धर्मग्रथ नावाच्या घटकाचा मोठा परिणाम घडून आलाय. एक नजर त्याच्यावरही...
धर्मग्रंथ व स्त्रीजीवन...म्हटल तर तसा मोठा गुंतागुंतीचा विषय आहे . आणि म्हटल तर स्त्रीदास्याची मोठी मोहीम या धर्मग्रंथ म्हणवणारी घटकातूनच झालेली आहे हे विसरता येणार नाही . खरेतर कुणाच्याही पायात " दास्याची बेडी " जो ग्रंथ अडकवतो त्याला धर्मग्रंथ म्हणावे का ? याचा विचार व्हावा. खरेतर हा " दास्यग्रंथ " आहे. ज्याला स्वतः ला गुलाम व्हायचे नसते त्याने दुसऱ्याच्या गुलामीची सोय करायची नसते. धर्मग्रंथ या घटकाने बहुतांशी आपले सगळे ( अ )ज्ञान स्त्री गुलामीकरता खर्च केलाय हे कटूसत्य आहे. " स्त्री ही लहानपणी बापाच्या , तरुणपणी पतीच्या व म्हातारपणी मुलांच्या कह्यात असते " असे प्रतिपादन करून धर्मग्रंथ नावाच्या घटकाने स्त्री गुलामी अधिक घट्ट केली. सतत कुणाच्या तरी कह्यात स्त्रीला अडकवून धर्मग्रंथाने " संस्कृती रक्षण " नावाखाली असंस्कृत वर्तन केले असे स्पष्ट म्हणायला हवे. स्त्रीचे धार्मिक वर्तनातील दुय्यमपणा , तिचा खालावालेला सामाजिक दर्जा , तिच्या शैक्षणिक प्रश्नांची हेळसांड , तिचे आर्थिक परावलंबीत्व , तिच्या राजकीय जीवनाला सुरुंग लावण्याचे यथाशक्ति काम धर्मग्रंथ नावाच्या घटकानी केले आहे. ही गुलामी इतकी पक्की होऊन बसली की स्त्री समाजातील काही जणीना मात्र हे सारे " संस्कृती वर्धनाचे कार्य " वाटते . अशा स्त्रीया मग धर्मग्रंथ नावाच्या शोषक घटकाचीच मनोभावे पूजा करत असतात. गुलामाला गुलामीची जाणीवच होत नाही तिथे बंड होणार कसे ?..असो. हे चित्र बदलायला नको का ? जो कुणी सामाजिक विवेकाचा आग्रह धरतो त्या प्रत्येकाला हे चित्र बदलावेसे वाटते. धर्मग्रंथ आणि स्त्रीजीवन हा विषय गुंतागुंतीचा कमी करून तो जाहीर संवादाचा विषय व्हायाला हवा. धर्मग्रंथ नावाच्या घटकाने स्त्री जीवानाकरता जे काही नियम , अपवाद केलेले आहेत त्याची खुली चर्चा व्हावी. या शोषक ग्रंथाना धर्मग्रंथ म्हणावे का याचाही जाहीर संवाद आवश्यक आहे.....हे सारे कशासाठी ? तर अशासाठी की याच धर्मग्रंथ नावाच्या घटकाने माझी आई , पत्नी , बहीण , मुलगी व मैत्रीण यांना वर्षानुवर्षे दास्यात रखडले आहे. आज जर मी आवाज उठवला नाही तर उद्याच्या अनेक पिढ्या पुन्हा गुलामीत मरत जाणार . हे थांबवणे मला प्रामाणिकपणे गरजेचे वाटते.
माणसांनो...शोषण कोणत्याही घटकाचे असो ते वाईटच आणि शोषक कोणताही घटक असो तो त्याज्जच ठरवायला हवा. शोषण होणारा घटक आणि शोषण करणारा घटक यांचे नाते कधीच मैत्रीचे होऊ शकत नाही . ते नाते विरोधाचेच असले पाहिजे . धर्मग्रंथ नावाच्या घटकाने स्त्रीजीवनावर केलेले अगणित वाईट परिणाम उघडरित्या दिसत असताना त्या धर्मग्रंथ नावाच्या घटकाची बाजू घेणारा निर्दयपणा आपण करावा का ?? की आपल्या घरच्या व समाजातील इतर स्त्री वर्गाच्या बाजूला उभे राहून त्यांना त्यांच्या गुलामीचे घटक उघडे करून दाखवावेत ? निर्णय प्रत्येकाला करायाचा आहे. मी केलाय...मी स्त्री समाजाच्या बाजूने उभा राहीन....तुम्ही ??
!! धर्मग्रंथ व स्त्रीजीवन..यांचे मैत्र असूच शकत नाही !!
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५