मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व नृत्यांकिका अमृता खानविलकर नेहमीच चाहत्यांच्या पसंतीमध्ये असते. इतकेच नव्हे तर लहान मुलंदेखील तिचे चाहते आहेत. सध्या सुरु असलेल्या ‘सुपर डान्सर महाराष्ट्राचा’ या रिएलिटी शोमध्ये देखील ती सर्वांचीच लाडकी असल्याचे दिसते. ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये अमृताही काही मागे राहिलेली नाही. तिने देखील सेलिब्रेशन केले आहे परंतू जरा हटके...
अमृताने ठाणे येथील जागृती पालक संस्थेच्या मतिमंद मुलांसोबत यंदाचा ख्रिसमस साजरा केला आहे. तिने यावेळी त्यांच्यासाठी खास भेटवस्तूदेखील आणल्या होत्या. तिने त्यांच्यासोबत वेळ घालवत त्यांच्या निरागस हास्यासाठी त्यांच्यासोबत खेळ देखील खेळले. या विशेष मुलांचा यावेळी नाच-गाण्याचा कार्यक्रम देखील आयोजीत करण्यात आला होता. याबाबत अमृता म्हणाली की, ‘मी दरवर्षी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटले आहे. त्यांचा सहवास मला आवडतो. मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहे, ही मुलं देखील निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळे असे म्हणताच येणार नाही. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे.’असे बोलून तिने आपला आनंद व्यक्त केला.