"मोडुन गेला संसार" "तरी मोडला नाही कणा पाठीवरती" "हाथ ठेऊन फक्त लढ म्हणा" या काव्य पंगती प्रमाणे कमांडो रामदास यांचा संघर्षमय प्रवास सुरु आहे अश्या जिगरबाज सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक माणूस आज सुरक्षित आहे छत्तीशगड मध्ये नक्षलवाद्यांशी कडवी झुंज देत असताना नक्षलवाद्यांची दाणादाण करत त्यांना पळताभुय थोडं केलं होतं यावेळी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर वीर रामदास भोगाडे यांना आपले दोन्ही पाय गुढघ्या पासून गमवावे लागले यामुळे भोगाडे यांचा खूप संघर्षमय प्रवास सुरू आहे
या शूर वीर भारतमातेच्या सुपुत्राचा जन्म पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वडोली गाव रातोना पाडा येथे झाला, चार भावंडांपैकी रामदास सर्वात धाकटा. आई-वडील अशिक्षित पण रामदासने
शिकायचे ठरवले. वडिलांचे नाव भाऊ भोगाडे व आईचे नाव लक्ष्मी भोगाडे. इयत्ता १ली ते १० पर्यंतचे शिक्षण गावातच (वडोली) कासेगाव शिक्षण संस्था या शाळेत झाले. शाळेत असताना गावातील एक तरुण सैन्यात भरती झाला व वर्दी घालून गावात प्रवेश केला. त्याला बघण्यासाठी गावकरी मंडळी जमा झाली, ते बघून रामदास प्रभावित झाला. व मोठेपणी सैनिक बनण्याची स्वप्न बघू लागला. शालेय जीवनात कबड्डी, खो-खो, धावणे , लांब उडी ,उंच उडी , क्रिकेट या खेळांमध्ये अव्वल होता. 11 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण विनवळ येथील आश्रम शाळेत झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी पदवी अभ्यासक्रमासाठी कला शाखेत गोखले एज्युकेशन सोसायटी जव्हार या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना सी आर पी एफ(सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स) मध्ये निवड झाली. 20 /11 /2010 रोजी पुणे येथील तळेगाव या ठिकाणी भरती झाला. सात महिने पुण्यात गेले, नंतर बेसिक प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेश मध्ये नीमच येथे (रिक्रुट ट्रेनिंग सेंटर) मध्ये 11 महिन्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर 14 महिने ग्रुप सेंटर जालंधर येथे सेवा दिली. 2013 मध्ये CRPF बटालियन 137 मध्ये रुजू झला.CRPF मध्ये अन्य दहा बटालियन असतात, त्यामधील कोब्रा बटालियनमध्ये जायचे ठरवले.1500 सैन्यातून चांगल्या क्रमांकाने निवड झाली. ऑक्टोंबर,नोव्हेंबर, डिसेंबर असे तीन महिन्यात कोब्रा कमांडो चे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. कोब्रा कमांडो हा दल सामान्य दल नसतो, या दलाचे प्रशिक्षण घेणे खूप कठीण असते. रामदासने ते सहज पूर्ण केले. यादरम्यान प्रशिक्षणामध्ये 46 दिवस 28 जणांचे नेतृत्व करून प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा CRPF - 134 तुकडी जॉईंट केली. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2016 रोजी कोब्रा कमांडो 208 ही तुकडी जॉईंट केली. छत्तीसगड राज्यात सुकामा येथे पोस्टिंग देण्यात आले.पोस्टिंग झाल्यानंतर तीन महिन्यासाठी घनदाट जंगलात जाऊन राहावे लागले.या तीन महिन्यात 50 पेक्षा अधिक ऑपरेशन्स केले. या प्रत्येक ऑपरेशन्समध्ये कमांडो रामदास यशस्वी झाला. आदिवासी भागातील असल्यामुळे जंगलाची चांगलीच ओळख होती. जंगलातून रस्ता शोधणे, पाऊलखुणा ओळखणे, पाऊलवाटा ओळखणे, दिशा समजणे अशा विविध गोष्टीचे ज्ञान त्यांना उपजतच होते. रामदासच्या या कामगिरीवर वरिष्ठ अधिकारी खुश होते. नक्षलवाद्यांचा प्रत्येक डाव तो हाणून पाडत असे. प्रत्येक वेळी नक्षली अपयशी होऊ लागले. कमांडो रामदास च्या या शौर्यामुळे दहशत संपूर्ण छत्तीसगडमध्ये पसरू लागली. या कर्तबगारीमुळे आत्ता फक्त छत्तीसगडमध्ये नाही तर संपूर्ण नक्षलवादी क्षेत्रांमध्ये कमांडो रामदास यांची दहशत माजली. नाव घेताच नक्षलवाद्यांना पळ काढावा लागत असे. कमांडो रामदास कधी येऊन मोहीम फत्ते करून कधी निघून जायचा कोणालाच कळत नसे. एके दिवशी सुकमा जिल्ह्यात पाडोली येथे CRPF च्या जवानांनी तळ ठोकला होता. जंगल इतके घनदाट होते की, सूर्य कोणत्या दिशेने उगवायचा व कोणत्या दिशेने मावळायचा हे कळत नसे. भर दिवसा अंधार असायचा. दिवसा झऱ्यांचा खडखडाट, पक्ष्यांचा किलबिलाट, हिंस्त्र पशूंचे वेगवेगळे आवाज याव्यतिरिक्त काहीही ऐकायला येत नव्हते. रात्री मात्र घोर शांतता असे. असंच एक दिवस कमांडो रामदास आपल्या साथीदारांसह मोहीम फत्ते करून आला थोडा विश्राम घेतो. तोच 30 जुलै 2016 रोजी जंगलात काही नक्षली हालचाली होत आहेत, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्या. देशभक्तीने पेटलेला रामदास पुन्हा उत्साहाने बहरला. साथीदारांना तयार केले. सर्वांनी गर्व वाटणारा आपला गणवेश तयार केला. बुटांचे लेस आवळून बांधली, कमरेचा बेल्ट टाईट केला, बुलेटप्रूफ जॅकेट घातले, आपली रायफल खोलून पुन्हा पुन्हा तपासून पाहिली. आणि हवे तेवढे साहित्य सोबत घेतले व रात्र व्हायची वाट बघू लागला. सर्वांच्या चेहर्यावर उत्साह दिसत होता. त्या घोर रात्री काळ्याकुट्ट काळोखात मोहीम फत्ते करायचा कट रचला जात होता. रामदासने मोहीम समजून सांगितली. कोण कोणत्या दिशेने, कोणत्या पोझिशन मध्ये राहील व किती अंतरावर राहील या सर्व सूचना देण्यात आल्या. सर्वत्र शांतता पसरली होती. कुणी कुणाशी बोलत नव्हते. काय घडणार आहे याचे मनामध्ये स्वप्ने प्रत्येकाला दिसत होते. सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. पक्ष्यांची किलबिलट शांत झाली होती. आता मात्र झऱ्यांच्या आवाज स्पष्टच येत होता. या स्मशान शांततेत रातकिड्यांचा आवाज किर्रर्रर्रर्र होत होता. मधूनच कुठून तरी कोल्ह्याचे भुंकन ऐकायला यायचं. आणि अशा स्मशान शांततेत बाहेर पडण्याची ती वेळ आली. निधड्या छातीच्या जवानांनी आपली रायफल उचलली व दब्या पावलाने दोन कंपन्या तंबूच्या बाहेर पडल्या आणि जंगलात विलीन झाल्या.
कमांडो रामदासच्या सूचनेप्रमाणे एका कंपनीचे तीन गट करण्यात आले. प्रत्येक बटालियनमध्ये 26 जवान होते. त्यामध्ये एका बटालियनचे नेतृत्व कमांडो रामदास करत होता. एक बटालियन पाचशे मीटर पुढे पाठवण्यात आली व एक बटालियन 500 मीटर डाव्या बाजूने पाठवण्यात आली, व याच पोझिशनमध्ये पुढे चालत राहण्याचे आदेश देण्यात आले. काळ्याकुट्ट काळोखात प्रत्येक जवान भारतमातेच्या रक्षणासाठी जीव हातात घेऊन चालत होता. त्या घनदाट जंगलात कधी नक्षलवाद्यांच्या बंदुकीची गोळी येईल किंवा कधी लँडमाईंड वर पाय पडून धमाका होईल याचा काही नेम नव्हता. असे असतांना सूचनेप्रमाणे सर्वजण पुढे चालत होते. प्रत्येक बटालियन वॉकी- टॉकी च्या माध्यमातून एकमेकांना सूचना देत होती. यादरम्यान 110 जवानांची कंपनी 1 किलोमीटर अंतरावर अंतर दूर गेली. एक संपूर्ण कंपनी जंगलात असल्याचे काही नक्षलवाद्यांच्या लक्षात आले. तसे नक्षली कारवायांना गती वाढायला लागली. सुमारे 300 च्या आसपास नक्षली या कंपनीचा पाठलाग करू लागले. ही गोष्ट कंपनी कमांडरच्या लक्षात आली, की आपण वेढले गेलो आहोत. लगेच त्या कंपनी कमांडरने कमांडो रामदास च्या बटालियन कडे मदतीची धाव मागितली. कमांडो रामदास ने आपल्या 500 मीटर दूर असलेल्या दोन्ही बटालियनला सतर्क केले व पुढे जाऊ नका आपली एक कंपनी पूर्णपणे घेरली गेली आहे, त्यांना मदतीची आवयशकता आहे, अशी सूचना दिली.सूचना मिळाल्यानंतर प्रत्येक जवानाला कळले की आपला शत्रू आपल्या आसपास येऊन पोहोचला आहे.सर्वजण सतर्क झाले व पोझिशन घेऊन थांबले. इतक्यात कमांडो रामदासला 110 च्या कंपनी कमांडरने सांगितले की पुढे हालचाल करू नका, आहे त्याच ठिकाणी पोझिशन घ्या. कमांडो रामदास ने आपल्या सहित दोन्ही बटालियनला सूचित केले.
सर्व ठिकाणी दबा धरून बसलेले शत्रु 110 कंपनी कडे धावू लागले. सर्व जवान आपली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले.इतक्यात अगदी 50 मीटर अंतरावर काही शत्रू कमांडो रामदासला दिसले. सर्वजन सतर्क झाले व त्याच्या दिशेने बंदुका रोखल्या. कमांडो रामदास पुढे सरसावला व अंदाधुंद फायरिंग सुरू केले. काही क्षणातच 12 ते 15 शत्रूंचा खात्मा केला. कमांडो रामदास ने केलेल्या फायरिंग चा आवाज पडोलीच्या जंगलात सर्वत्र घुमला. फायरिंग चा आवाज ऐकून ज्या कंपनीला 300 शत्रांनी घेरले होते ते सर्व शत्रू रामदास च्या दिशेने धावले. व रामदासची 26 जवानांची बटालियन सुमारे 300 ते 350 नक्षलवाद्यांनी घेरली. कमांडो रामदास ने 500 मीटरवर असलेल्या आपल्या दोन बटालियन शी संपर्क केला व मदतीची धाव मागितली. इतक्यात त्यांच्या दिशेने अंदाधुंद फायरिंग सुरू झाली. दोन ते अडीच तास या फायरिंग चा सामना रामदास करत राहिला. फायरिंग इतकी अंदाधुंद होती की 500 मीटर वर असलेली बटालियन मदतीसाठी एक वित पुढे येऊ शकली नाही. पण कमांडो रामदास ने हार मानली नाही व मागे हटला नाही. सडेतोड उत्तर देत एक एक शत्रू टिपायला सुरुवात केली.रामदासच्या फायरिंगने बरेच जण मरत आहेत हे बघून शत्रांनी तेथून पळ काढायचा निर्णय घेतला. या चकमकीत रामदासचा एक जवान शहीद झाला. मोहीम फत्ते करून वीर पुन्हा आपल्या तंबूत आला. एकीकडे कमांडो रामदासच्या शौर्याची गाथा सर्वत्र पसरू लागली व दुसरीकडे शत्रूचे प्रचंड नुकसान होऊ लागले. कमांडो रामदास चे नाव ऐकल्यावर शत्रूचा थरकाप उडु लागला.
29 नोवेंबर 2016 पुन्हा एकदा शौर्य दाखवण्याची वेळ आली. वरिष्ठ अधिकाऱ्या कडुन सूचना मिळाली. कमांडो रामदास ने आपले जवान तयार केले व तीन गटा मध्ये विभागले. याच दिवशी सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस(SP) यांचा दौरा होता. एक तुकडी(SP) साहेबांच्या संरक्षणासाठी पाठवण्यात आली. दोन तुकड्या आपल्यासोबत घेऊन सिंह पुन्हा एकदा जंगलात शिरला. सुमारे 10 ते 15 किलोमीटर आत गेला. सर्व जंगल पिंजून काढले.कमांडो रामदास जंगलात शिरला हे लक्षात आल्याबरोबर एकही शत्रूची त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत झाली नाही. सर्व शत्रू पळून गेले. कमांडो रामदासला शत्रु नसल्याची खात्री झाली व सर्व सहकाऱ्यांना घेऊन कॅम्पकडे परतू लागला. सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतर जवळ आल्यावर, त्याला काही विपरीत असल्याचा संशय आला. सर्वांना सतर्क केलेे व आहे त्याच ठिकाणी स्तब्ध उभा रहायचा आदेश दिला. "कोणीही हालचाल करू नये मला या जागेचा संशय येत आहे", "आधी मी तपासून खात्री करतो तोपर्यंत कोणीही हालचाल करू नका" असा आदेश देण्यात आला. सर्व जण स्तब्ध उभे राहिले. कमांडो रामदास ती जागा तपासण्यासाठी दब्या पावलाने पुढे सरकू लागला. त्या जागेवर गवत उगवले होते झाडांची सावली व सुकलेली पानं पडली होती. चहूबाजूने बघायचे व पुढे पाऊल टाकायचे, खात्री झाल्यावर दुसरे पाऊल टाकायचे.काही अंतर पुढे गेला. चहूबाजूंनी पाहिल. पाऊल उचलून टाकलं तोच मोठा धमाका झाला. क्षणभर काहीच कळलं नाही. सर्वांनी पोझिशन घेऊन आवाजाच्या दिशेने बंदूक आपल्या रोखल्या. विस्तीर्ण घनदाट जंगलात धमक्याचा आवाज घुमत राहिला. सुमारे दहा मिनिटाने रामदास ओरडला, "सवंगड्यांनो मला उचलायला या" माझा पाय लँडमाईंडवर पडला आहे. हे ऐकून दोन जवान जिवाची पर्वा न करता पुढे सरसावले, आणि बघतात तर कमांडो रामदास यांचे दोन्ही पायांच्या चिंधळ्या झाल्या होत्या. मांडीपासून एक पाय शरीराला नव्हता. अशा अवस्थेत कमांडो रामदास उचलण्यात आले व ट्रॅक्टर मधून तळ असलेल्या ठिकाणी आणले. सर्व सहकार्यामध्ये दुःखाचे वातावरण पसरले. सहकारी देवाकडे प्रार्थना करू लागले. वरिष्ठांच्या हालचाली वाढल्या. SP साहेबांना सोडायला आलेले हेलिकॉप्टर जात असताना ते परत बोलावण्यात आले. त्या हेलिकॉप्टरमधून CRPF कॅम्प मध्ये आणण्यात आले. तेथे दुसरे हेलिकॉप्टर 5 डॉक्टर व वैद्यकीय सुविधांनी सज्ज होऊन वाट बघत होते. तात्काळ त्या हलोकॉप्टरमध्ये शिफ्ट करण्यात आले.व रायपूर येथे हलवले. रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर लँड झाले व रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पोचवले. संध्याकाळी 6.30 यादरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करेपर्यंत सुमारे 6 ते 7 तास रामदास कधीही बेशुद्ध झाला नव्हता. शस्रक्रियेसाठी त्याला बेशुद्ध करण्यात आले.पाच तासांनी कमांडो रामदास शुद्धीवर आला. आणि काही क्षण हताश झाला.चित्त्याचा वेग असलेले, खारीची चपळता असलेले, सिंहाची ताकत असलेले पाय कमांडो रामदास कडे नव्हते. क्षणातच काळीज शिरले. लहानपणीच्या खेळापासून ते कोब्रा कमांडो च्या प्रशिक्षणापर्यंत व रुजू झाल्यापासून ते प्रत्यक्ष लढाई पर्यंत सर्व दिवस आठवले. बिना पायाने आयुष्य कसं जगायचं या विचाराने मन मरून गेले. या क्षणी पत्नी कमांडो च्या वर्दी मध्ये येऊन जवळ उभी राहिली.आणि म्हणाली घाबरू नका तुमच्या जागी मी लढेन, तुमच्या पाया चा बदला मी घेईन. तिचे हे शब्द एकून दुःख कुठल्या कुठे पळून गेले. व छाती मध्ये पुन्हा ते सिंहाचे बळ आले. अंगात नवचैतन्य संचारले. व तिला म्हणाले "तू नाही, माझ्या शरीरात जोपर्यंत रक्ताचा एक एक थेंब आहे, तोपर्यंत मीच या भारत मातेची सेवा करेन. आणि निर्धाराने लढण्याचा मनाशी निश्चय पक्का केला.
त्यावेळी डॉक्टर बोलले तीन ते चार महिने बरा व्हायला लागतील. पण कमांडो रामदास 45 दिवसात बरा झाला. डॉक्टर बोलले असा कमांडो पहिल्यांदा पाहिला की जो इतक्या लवकर बरा झाला. कृत्रिम पायावर चालण्याचे 30 दिवसाचे प्रशिक्षण 7 दिवसात पूर्ण केले. तीन महिन्या नंतर तोल सांभाळता येतो, कमांडर रामदास एक महिन्यातच चालायला लागले. कमांडो रामदास म्हणाले जर मला धावायचे पाय मिळाले तर मी तीन महिन्यात तोल सांभाळणार नाही तर या देशासाठी जागतिक मॅरेथॉन धावेन.
रामदास जी सलाम तुमच्या शौर्याला व नमन जन्म देणाऱ्या मातेला सलाम
दिवाळीच्या सुट्टीत रामदास हे आपल्या रहात्या घरी आले आहेत यावेळी त्यांची घेतलेली मुलाखत अप्रतिम होती नक्षलवाद हा जिवंत आहे कारण त्यांना चुकीच्या प्रकारे मार्गदर्शन व शासनाच्या विरोधात भडकवल जात आहे त्यांना भडकवणारे मध्यप्रदेश बिहार येथील काही व्यक्ती आहेत त्यांचा शासनाने शोध घायचा आहे.