मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. शरद कदम यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सवित्री उत्सव
३ जानेवारी २०१९
नव्या वर्षातला पहिला संकल्प करूया........
१ जानेवारी १८४८,
मुलींची पहिली शाळा.....
१७० वर्ष झाली या घटनेला.....
पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंच्या आणि फातिमा शेख यांच्या मदतीने सुरू केलेली ही शाळा.
त्यानंतर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, मामासाहेब जगदाळे यांच्यासारख्यांनी ग्रामीण भागातील मुलांना पाठीवर बसवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. पण आज सरकारी पातळीवर शिक्षणाची काय दुरावस्था आहे. शाळांना अनुदान नाही, विनाअनुदानितच्या शिक्षकांना पगार नाही. २५ वर्षांपूर्वी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेला चौथीच्या मुलाला साक्षर करा या साठी आंदोलन करावे लागले होते. आज ही थोडया फार फरकाने तीच स्थिती आहे. शिक्षण महागडे होत आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणाने गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांच्या मुली-मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे हा एक गंभीर प्रश्न बनला आहे.
सावित्रीमाईच्या जयंती निमित्ताने आपण एक संकल्प करू शकतो का? शाळेच्या बाहेर असलेल्या, ड्रॉप आऊट घेतलेल्या, शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा आपण शाळेत आणून दाखल करु शकतो का? ते शाळेत टिकतील यासाठी प्रयत्न करु शकतो का? शिक्षण सोडून नोकरी करत असलेल्या मुलांना किमान रात्र शाळा-कॉलेजची वाट दाखवू शकतो का?
आज हा संकल्प करूयाच आणि किमान परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसलेल्या मुलां-मुलींच्या पुस्तकं, गणवेष, शालेय साहित्यासाठी काही मदत तर आपण नक्कीच करु शकतो.
वंचित घटकातील मुले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले यांच्या साठी आपलं घर सारखा उपक्रम गेली पंचवीस वर्षे राष्ट्र सेवा दल नळदुर्ग जिल्हा सोलापूर येथे चालवीत आहेत. त्यांना मदत करण्याचा व मदत मिळवून देण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू शकतो. आणि जाता जाता एक आठवण करून देतो, पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरू झालेल्या सावित्रीबाईच्या पहिल्या शाळेची म्हणजेच आपल्या शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या शाळेतून झाली तिची अवस्था कधी तरी जाऊन बघूया. राज्यकर्त्यांनी त्या शाळेचे जतन करायला हवे.मात्र सरकार स्वतः होऊन काही करणारच नाही. आपण तिथे जात राहिलो, जनमत काय आहे हे दाखवुन देत राहिलो तर सरकारला त्या शाळेचे जतन करावे लागेल. यापैकी सगळच सगळ्या ठिकाणी होणार नाही. तुमच्या गावात, शहरात यापैकी एखादा संकल्प पुढे सरकला तरी बाकीच्यांसाठी उत्साह वाढेल. राज्यपातळीवर सर्वजण मिळून एखादा संकल्प पार पाडण्याबाबत तुमच्या काही सुचना असतील तर जरुर कळवा. या मनात फुललेल्या ज्योतीचा संकल्प आज नक्की करू या .......
राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सावित्री उत्सव केला जातो. मुंबईत ३ जानेवारीला सायं ६.३० वाजता दादरच्या *छबिलदास शाळेत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर च्या छबिलदास शाळे सोबत सावित्री उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण आवर्जून या आणि जिथे शक्य होईल तेथे सहभागी व्हा......
शरद कदम
कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई
पाहा हा व्हिडिओ -