खरा शिवशाहीर मृत्यूनंतरही उपेक्षितच...

ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करून प्रारंभे, डफावर थाप तूनतून्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभुंचं गातो गुणगान जी र हा जी जी... हा पोवाडा ज्या शाहिराने लिहिला... तो शाहीर आज ही मृत्यूनंतरही उपेक्षितच आहे... पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2021-02-19 15:55 GMT

चांदा ते बांदा पसरलेल्या महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यात उंचावर टांगलेल्या स्पिकरच्या भोंग्यातून पंचक्रोशीत एक पहाडी आवाज गर्जू लागतो…

ओम नमो श्री जगदंबे

नमन तुझ अंबे

करून प्रारंभे

डफावर थाप तूनतून्याचा

शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण

शिव प्रभुंचं गातो गुणगान जी र हा जी जी

Full View

हा आवाज ज्या कानापर्यंत पोहोचतो. त्या त्या व्यक्तीच्या अंगात डफाच्या कडकडाटासोबत रक्त सळसळायला सुरुवात होते.

हा पोवाडा आहे. महाराष्ट्राच्या मातीतील पहाडी आवाजात शिवरायांचा वारसा गावागावापर्यंत जागृत ठेवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा. महाराष्ट्रात दोन सह्याद्री आहेत. एक भूगोलात तर दुसरा सांस्कृतिक इतिहासात. शाहिरी परंपरेने सह्याद्री पर्वताप्रमाणेच महाराष्ट्राची लढाऊ परंपरा येथील चळवळ आणि महापुरुषांचा इतिहास विस्मृतीत जाण्यापासून वाचवले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे त्या परंपरेतील महत्त्वाचे नाव. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिलेले ऐकलेले श्रोते सांगतात... 'शाहीर इतिहास समोर आणून उभा करत होते.'

शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी अनेक पोवाडे लिहिले.

शिवजन्म पोवाडा, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका,राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचा धगधगता इतिहास त्यांनी पोवाड्यातून मांडला.

ही कथा नव्हे षंढाची गावगुंडाची

चोर भामट्याची

चोर भामटयाची

लुच्या पुढाऱ्याची

सत्य कथा नाना पाटलाची जी र हा जी जी

अशा परखड शब्दांमध्ये त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची सत्यकथा पोवाड्यातून महाराष्ट्रासमोर मांडली.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येणारे मालेवाडी हे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे गाव. शाहीर आपल्या पोवाड्यातून आपल्या गावाची ओळख सांगायचे

सांगली जिल्हा

वाळवे तालुक्याला

मुक्कामी मालेवाडीला

शाहिराने साज चढविला

पूर्ण चढवून शाहिरी साजाला

शाहीर देशमुख गातो पोवाड्याला

गातो पोवाड्याला जी र हा जी जी

ज्या गावाचा उल्लेख ते आपल्या प्रत्येक पोवाड्यात करायचे त्या त्यांच्या मालेवाडी या गावात पोहचून त्यांच्या स्मृती शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मोडखळीस आलेले त्यांचे घर त्यांचे सुपुत्र जयवंत देशमुख यांनी आम्हास दाखवले. शाहिरीचे काम करत असताना त्यांचे स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी स्थापन केलेले दत्त मंदिर आणि बाजूला त्यांची जीर्ण समाधी आमच्या नजरेस पडली. समाधीचं एक कोपरा तुटलेला आहे. या समाधीवर साधे त्यांचे नाव देखील नाही.

त्यांच्या मुलांना या समाधीवर मेघडंबर बसवायची आहे. त्यासाठी ते या भागातील नेते नानासाहे महाडिक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनाही भेटले. पण आश्वासनापलीकडे काही झाले नाही. आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या या शिवशाहीराची समाधी देखील उपेक्षितच राहिली आहे.

त्यांच्या शाहिरी चमुसोबत काम केलेले शाहीर संभाजी जाधव सांगतात...

आम्ही सुरवातीला कार्यक्रमाचे सर्व साहित्य घेऊन तीन तीन किलोमीटर अंतर चालत पोहचायचो. त्यानंतर गाडी घेतली. शाहीर कधीही मानधनाच्या पैशाला अडून बसत नव्हते. कलाकारांना देऊन गाडीचे डिझेल खर्च द्या. मग चटणी भाकरी दिली तरी चालेल. असे म्हणून ते कार्यक्रम ठरवायचे. बऱ्याचदा आम्ही गावांतील घरातून मागून जेवण खाल्ले आहे. या परिस्थितीत त्यांनी शिवरायांचा इतिहास राज्यभर पोहोचवला. पण आज देखील त्यांनी रचलेल्या साहित्याचे संकलन झालेले नाही. त्यांच्या पोवड्यांचे तब्बल २२२ तासांचे रेकॉर्डिंग आज उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने त्याचे संकलन करून त्याचा ग्रंथ प्रकाशित करावा. त्यांच्या योगदानावर माहितीपट बनवावा. त्यांना मरणानंतर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन योग्य सन्मान करावा.

आज डिजिटल माध्यमांचा काळ आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव यूट्युबवर टाकले की, असंख्य गाण्यांची यादी तुमच्या समोर येते. पण ज्या काळात महाराजांची गाणीच उपलब्ध नव्हती. त्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास गावागावात जागृत ठेवण्याचे काम या शिव शाहिरांनी केले आहे.

त्या काळात तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी त्यांचा त्यावेळी सत्कार केला होता. इंदिरा गांधी यांनी त्यांना शाबासकी दिली होती.

महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून शिव चरीत्र पेरणारे शाहीर सरकारी दरबारी उपेक्षाच झाली. त्यांच्या कलेचा वापर अनेक राजकारण्यांनी प्रचारासाठी केला. त्यांनी ज्यांचा प्रचार केला बहुतांश वेळा ती व्यक्ती निवडून यायचीच.

त्यांचे पुत्र जयवंत बाबासाहेब देशमुख सांगतात त्यांच्या वडिलांचा राजकीय वापर केला गेला. त्याचबरोबर त्यांच्या कलेचा वापर करून अनेक कंपन्यांनी लाखो रुपये कमावले, टिप्स कंपनीने त्यांना प्रती पोवाडा तीन हजार पाचशे रुपयांप्रमाणे रक्कम दिली. ही रक्कम त्यावेळी मोठी वाटत होती. मात्र, त्या बदल्यात त्या सर्व पोवड्यांचे हक्क कंपनीने घेतले. त्यानंतर एकही रुपयाची रॉयल्टी दिली नाही. टिप्स चे मालक कमल मेंधानी यांनी बाबासाहेबाना केलेला पत्रव्यवहार त्यांनी मॅक्स महाराष्ट्रला दाखवला. सुमित या कॅसेट कंपनीने देखील अशाच प्रकारचा व्यवहार केल्याचे ते सांगतात.

या गावचे नागरिक विलास पाटील सांगतात शिवशाहीर हे या शतकातील सर्वोतकृष्ट शाहीर होते. असे उद्गार स्वतः महाराष्ट्रभूषण असलेले बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील शाहिरांचे योगदान जाणून होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवशाहीरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. असे असतानाही त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंचवीस हजार रुपयाची मदत त्यांना उपचाराकरिता केली होती. याचबरोबर इस्लामपूर येथील डॉक्टर शहा यांनी त्यांचा मोफत उपचार केला होता. आयुष्यभर धावपळ केल्याने त्यांना विविध व्याधींनी ग्रासलेले होते. त्यातच त्यांचा 2003 या साली मृत्यू झाला.

ते जिवंतपणी उपेक्षित राहिले. मेल्यावरही सरकारने त्यांचा सन्मान केला नाही. त्यांचे कुटुंबीय हलाखीत आयुष्य काढत आहेत. त्यांचे समाधी स्थळ दुर्लक्षित आहे. असे असताना आता मेल्यावर तरी सरकारने त्यांचा योग्य सन्मान करावा.

एखाद्या कलाकाराची त्याच्या जिवंतपणी उपेक्षा करणे. हा पडलेला चुकीचा पायंडा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्याबाबतीत सुद्धा तसाच दिसत आहे. राज्यात शिवरायांच्या विचारांचे सरकार आहे. या सरकारने तरी या शिवशाहीरांचा यथोचित सन्मान करावा ही भावना त्यांच्या कुटुंबीयांची आहे.

Tags:    

Similar News